Horror Stories In Marathi – आजची हि Marathi Bhaykatha no. 10 – शेवटची रात्र हा माझ्या एका मित्राच्या सोबत घडलेला जीवघेणा थरारक अनुभव.

Marathi Bhaykatha no. 10 – शेवटची रात्र (Horror Stories In Marathi)

ऑफीसची लाईट्स बंद करून ते आपापल्या घरी जायला निघाले.

अजित, राजेश, कमल आणि ऋषि चौघे एकमेकांचे लहानपणी पासूनचे पक्के मित्र,. कॉलेजमध्ये एकाच ठिकाणी शिक्षण झाल्या नंतर आता जॉब मध्ये सुद्धा एकत्र होते.

“ए मी काय म्हणतो, एवढे दिवस आपण बिना सुट्टीचे काढले, त्यात दिवाळी सुट्टी सुद्धा आपण कामच करत होतो, पण आता सिरियसली कंटाळा आलाय, असं वाटतंय थोड्या दिवसांसाठी कुठेतरी जाऊया फिरायला”

राजेश उत्सुकतेने म्हणाला,
त्याच्या वक्तव्याला उत्तर देत अजित म्हणाला,

“तसं तू म्हणतोय ते पण बरोबर आहे, थोडे दिवस तरी रिलॅक्स हवाच आयुष्यामध्ये”

“हो जाऊ आपण, पण जायचं कुठे” कमल त्याचे वाक्य कापत बोलला

त्यावर राजेशने उत्तर दिले, “आपण दिवा बेट वर जाऊया, मस्त फिरू, मनसोक्त पार्टी करू”

इतक्या वेळ शांत असलेल्या ऋषिने दिवा बेटच नाव ऐकल्यावर त्याचे मौनव्रत तोडले.
‘अरे बाबांनो तुम्हाला वेड लागलय, ते ठिकाण खूप दिवसांपासून बंद आहे आणि तिकडे खूप चित्र विचित्र हौन्टेड घटना घडायच्या पण बातम्या आल्यात’

“अरे फट्टू, हम मौत से खेलनेवाले लोग है, ह्या असल्या बातम्यांवर आपण विश्वास ठेवत नाही”
राजेश कुत्सितपणे हसत म्हणाला

पण ऋषिला मात्र ह्यामध्ये इंटरेस्ट नव्हता तो म्हणाला-
‘तुम्ही जा बाबा, करायचंय ते करा, मी आपले मित्र म्हणून सांगायचं काम केलंय’

Horror Stories In Marathi – हौंटेड हायवे | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – झपाटलेलं रेल्वे स्टेशन | Storyteller Rushi

त्याच्या ह्या वक्तव्यावर कमल चिडून बोलला-
“जा म्हणजे काय? तू सुद्धा यायचंय आमच्या सोबत आणि तिकडे बंदी असायला आपण काय दिवसा नाही जाणार तिकडे,. रात्री जाऊ, पार्टी करू आणि दिवसा परत रिटर्न. आणि तू जर नाही आलास, तर आम्ही पूर्ण ऑफिस भर पसरवू की तू किती फट्टू आहे ते”

ऋषीला आता गत्यंतर नव्हता, आणि हे चौघे होतेच सोबत, नाईलाजाने त्याला सुद्धा त्यांच्या सोबत जावे लागले.

तर दिवस ठरला,
ठरल्याप्रमाणे जागेवर आणि वेळेवर सर्वजण पोहोचले.
जसा दिवस मावळला, तसे ते होडीने त्या बेटाकडे जायला निघाले.
सोबत खायचे सामान, दारू, कॅम्पिंग टेंट वैगेरे सर्व गोष्टी घेतल्या.

राजेश, अजित आणि कमल बिनदास्त होते,
ऋषीच्या मनात मात्र असंख्य विचारांचे लपंडाव चाललेले.

ते सर्व बंदराच्या जवळ जातच होते की,

‘अरे ये पोरांदो, मागंला फिरा, परत जावा, इकडून गेलात तर परत येवाचं न्हाय’

चौघांनी दचकून मागे बघितले, एक साधारण सत्तरीच्या आसपासचे आजोबा त्यांच्याकडे बघून इशारे करत होते

‘बघा मी बोलत होतो ना, इकडे जाणे म्हणजे आपल्या जीवाशी खेळणे आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, आपण परत जाऊया का?’
ऋषि अत्यंत भीतीच्या स्वरात बोलला

पण त्याला प्रत्युत्तर देत राजेश बोलला
“गप तू, आता प्लॅन ठरलाय, इथपर्यंत आलोय आता मागे नाही जायचं, त्या म्हाताऱ्याकडे लक्ष नको देऊ, सनकी वेडा वाटतोय तो, चला आपण”

चौघे होडी मध्ये बसले, होडी संथ गतीने पाण्यात चाललेली. समुद्र भयंकर शांत होता, कानाला सुखावणारा लाटांचा आवाज आणि मध्येच होडीच्या इंजिनचा आवाज ह्या व्यतिरिक्त कोणतेच आवाज नव्हते.

बेटावर पोहोचले तेव्हा चांगलीच रात्र झालेली, चंद्राचा प्रकाश रस्ता दिसण्यासाठी पुरेसा होता.
बेटावर लाईटहाऊस आणि मोजकी घर सोडली तर पूर्ण जंगल होतं.

त्या घरांमध्ये सुद्धा कोणी राहत नव्हते सर्व घर ओसाड पडलेली.

आणि त्या लाईटहाऊस मध्ये लाईटहाऊस किपर पण नव्हता.

असे वाटत होते पूर्ण जगापासून त्या बेटाला सर्वांनी वाळीत टाकले आहे.

होडीतून उतरल्या नंतर जास्त लांब न जाता, समुद्राच्या जवळच टेंट बांधले, शेकोटी पेटवली, आणि सोबत आणलेले समान काढून प्यायला बसले.

राजेश, कमल आणि अजित तिघेही पिणारे होते, ऋषी ह्या व्यसनांपासून अलिप्त होता.

त्याने फक्त खाणेच पसंत केले.

गप्पा रंगल्या, ऋषि सोडता बाकी सर्वांची पिल्यामुळे शुद्ध हरपलेली,

रात्र गडद होत चाललेली, आजूबाजूला भयाण शांतता, आणि त्यात अधून मधून समुद्राच्या लाटांचा येणारा आवाज.
गार वाहणाऱ्या वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्श करून जायची, तेव्हा सर्वांगावर शहारे आल्याशिवाय राहत नव्हते.
शेकोटी पण आता हळू हळू विझू लागलेली.

तितक्यात राजेशला लघुशंका आली.
तो उठला आणि थोड्या अंतरावर लघुशंका करावयास जायला लागला.
इकडे दोघेजण पिऊन मदमस्त झालेले, ऋषि सुद्धा आता डुलक्या द्यायला लागलेला.

Horror Stories In Marathi – फोटो स्टुडिओ | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – शौर्यकथा – वाडा | Storyteller Rushi

खूप वेळ झाला पण राजेश काही परत आला नव्हता.

“अरे यार हा राजेश कुठे मेला आता इकडे चांगली मैफिल रंगलेली”- कमल त्रासलेल्या स्वरात म्हणाला

‘अरे पडला असेल तो कुठेतरी, साला आपल्याला बोलतो मला चढतंच नाय आणि आता बघ.
थांब मी येतो बघून त्याला’ – अजित उठला आणि डुलत डुलत राजेश ला शोधायला निघाला

अजित जसा शेकोटीपासून लांब लांब होत चालला तसा त्याला रस्ता कमी दिसायला लागला.
थोडाच पुढे गेला असेल, की त्याला पाठमोरा उभा असलेला राजेश दिसला.
“अरे राजू तू इकडं आहेस, आणि आम्ही तिकडे वाट बघतो तुझी”

राजेश काहीच न बोलता तसाच उभा राहिला

“आता काय अख्या बाटल्या खाली करतो काय, चल लवकर सगळे थांबलेत तुझी वाट बघत”

तरी सुद्धा राजेश काहीही उत्तर न देता तसाच उभा राहिला

आता मात्र अजितला पुरता राग आला, तो चालत राजेश जवळ गेला आणि त्याने त्याचे हात पकडून त्याला मागे वळवले,
राजेश जसा मागे वळला, तसे अजितचे डोळे विस्फारले, हृदयाची धड धड इतकी जास्त वाढली, की त्या स्मशान शांततेत त्याला स्पष्टपणे ऐकू येऊ लागली.

राजेशला चेहरा च नव्हता, फक्त सपाट त्वचा, त्यावर ना डोळे होते, ना नाक आणि नाही तोंड.

अजित त्वरित २ पावले मागे झाला आता पर्यंत जेवढी पिलेली ती एका क्षणात सगळी उतरली, लगेच स्वतःला सावरले आणि धावत मागे आला जिकडे ऋषि आणि कमल होते.

त्याला त्या अवस्थेत पाहून कमल ने विचारले
“काय रे एवढं हफाफायला काय झाले, काय भूत-बित बघितलंस का काय? आणि राजेश कुठे आहे त्याला आणायला गेलेलास ना”

कमल चे वाक्य पूर्ण होईपर्यंत अजितचा श्वास त्याच्या ताब्यात आलेला,  तो म्हणाला
‘अरे, अरे तो राजेश, तो राजेश तिकडे’

‘अरे काय झाले नेमका एवढा का बिचकतोयस’
ऋषिने आश्चर्याने विचारले

‘तो राजेश नव्हता, मी त्याला शोधायला गेलो, तो तिकडे उभा होता, मी त्याला खूप हाका मारल्या, पण त्याने काहीच उत्तर नाही दिले, तसंच एखाद्या पुतळ्या सारखा उभा राहिला, आणि जेव्हा मी जवळ जाऊन त्याला हलवले तेव्हा त्याचा चेहरा बघितला तो पूर्णपणे सपाट होता, त्याला डोळे, कान, नाक काहीच नव्हते
मी खूप घाबरलो आणि लगेच पळत आलो’

“अजित तुझं डोकं फिरलंय, काहीही काय बोलतोस, पिऊन पिऊन त्या राजेश ऐवजी तुलाच जास्त चढलीय, ही काय मस्करी करायची वेळ आहे का?” – कमल जरा चिडूनच बोलला

‘शांत व्हा तुम्ही दोघे आधी, आपण एक काम करू आपण तिघेही बघायला जाऊया’ – ऋषि त्यांना समजावत म्हणाला

तिघेही राजेश ज्या दिशेला गेलेला तिकडे जायला निघाले, मगाशी अजितला जिकडे राजेश दिसलेलं, तिकडे आता कोणी नव्हते.

त्यांनी जवळपास आजू-बाजूला सगळीकडे शोधले पण राजेश चा कुठेच पत्ता नव्हता.

“हा नक्कीच रस्ता भटकला असेल, तरी बोलत होतो नको इतकी पिऊ आणि त्यात मोबाईल पण आपल्या जवळ ठेवून गेला” – कमल त्रासलेल्या स्थितीमध्ये म्हणाला

‘एक काम करू आपण तिघे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याला शोधू, आणि ज्याला कोणाला भेटेल त्यांनी लगेच कॉल करा’- ऋषि सर्वाना दिलासा देत म्हणाला.

एव्हाना सगळ्यांची होती नव्हती ती सुद्धा उतरलेली.

तिघे निघाले वेगवेगळ्या दिशेने, 
अजित गेला लाइटहाऊस च्या रस्त्याला..
कमल गेला जंगलाच्या रस्त्याला आणि ऋषि समुद्राच्या दिशेला.

लाईटहाऊस चंद्राच्या प्रकाशात अजूनच भकास भासत होता. राजेशला हाका मारत अजित चाललेला, की तितक्यातच लाईटहाऊस च्या वरच्या खिडकीमध्ये त्याला राजेश दिसला,
अजित थोडा अजून जवळ गेला,  ह्या वेळी मात्र त्याला चेहरा होता, अजितला जरा हायसं वाटलं त्याने खालूनच राजेशला आवाज दिला, पण राजेशच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नव्हते.

अजित चिडून लाईटहाऊस च्या वर जायला लागला.
जसा अजित वर गेला तसा त्याला एक आश्चर्याचा आणि त्याच बरोबर भीतीचाही धक्का बसला.
मगाशी ज्या खिडकीत राजेश उभा होता, आता टिकडे कोणीच नव्हते.

अजित त्या खिडकीपाशी आला आणि खिडकीतून खाली बघितले तर ह्यावेळी त्याला फक्त भीतीचा धक्का बसला कारण खाली राजेश त्याला बघून हसत होता.
आता मात्र त्याची चांगलीच दातखिळी बसली, मागसाच्या प्रसंगातून तो नीट सावरलं नव्हता तेच आता हे.
त्याचे हात पाय लटपटू लागले, तो बाहेर जाण्यास मागे वळला की तेच त्याच्या समोर एक मुलगी उभी असलेली त्याला दिसली, तिचे कपडे फाटलेले, चेहऱ्यावरून रक्त बाहेर येत होते, आणि डोळे तर जसे आग ओकत होते, आणि दोन्ही पाय उलटे,

अजितची किंचाळी त्याच्या घशातच अडकली,
तो काही हालचाल करणार की तितक्यातच त्या मुलीने, त्या भूताने, अजितच्या अगदी जवळ येऊन तिचे मोठ मोठे नखं असलेली बोटे अजित च्या मानेवरून एखाद्या सूरी सारखी फिरवली.

मटण साठी खाटीक बकरीच्या मानेवरून सुरा फिरवतो तेव्हा जसे तिच्या मानेतून रक्ताचे पाट बाहेर येतात
तसे अजितच्या मानेवरून रक्ताचे पाट बाहेर येऊ लागले.
अजित खाली पडला आणि हात पाय तडफडत मरणाची वाट बघू लागला.

काही काळ गेला आणि अजितच्या हातापायांची हालचाल थांबली, तो कायमचा झोपी गेला.

इकडे कमल भर जंगल मध्ये गेला,
पूर्ण जंगल सामसूम, आणि झाडांनी भारलेले.
आक्खा जंगल पालथे घातले, पण राजेशचा कुठेच पत्ता लागला नाही
कंटाळून तो परत जाण्यास फिरला तेच त्याची नजर एक झाडावर गेली, 
तिकडे एक मृत शरीर झाडाला लटकवलेले.

कमल ने घाबरत घाबरत त्या झाडाजवळ जायची हिम्मत केली, 
आणि जसा तो झाडाजवळ पोहोचला, तसं त्याला रडू कोसळले.
ते दुसरे तिसरे कोणी नसून राजेशचे शरीर होते.
शरीरावर ठीक – ठिकाणी ओरबडल्याच्या जखमा होत्या, आणि डोळे पूर्ण सताड उघडे, त्यात काहीच हावभाव नव्हते. तोंडातून जीभ बाहेर आलेली.

कमलने क्षणाचाही विलंब न करता तिकडून काढता पाय घेतला, पण जसा तो मागे वळला, तसा त्याचा पाय कशात तरी गुंतून तो जोरात जमिनीवर आपटला,

जसा जमिनीवर आपटला तसे त्याला जाणवले त्याच्या सर्वांगावर कसली तरी पकड बनत चालली आहे, 
त्याने भीत भीत शरीराकडे बघितले, तर त्याच्या पूर्ण शरीरावर झाडांच्या फांद्यांनी आपली पकड बनवलेली.

शरीर पूर्ण झाडाच्या फांद्यांनी झाकून टाकले गेले, त्याला ना ओरडता येत होते ना नीट श्वास घेता येत होते.

तो पूर्णपणे झाडांनी वेढला गेला आणि जसा राजेश लटकलेला तसाच कमल पण लटकला गेला.

आता सर्व फांद्या त्याच्या छातीवरून तोंडाकडे वळल्या,
त्याचा तोंड आणि नाक दोन्हीपन दाबले गेले

अम्म्म अम्म्म ऽऽऽ
ह्या व्यतिरिक्त त्याच्या तोंडून काहीच निघत नव्हते.

Horror Stories In Marathi – खेकडा? की | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – त्या भयाण रस्त्यावर | Storyteller Rushi

नाक बंद झाले, त्याचे श्वासोच्छ्वास बंद झाले, एकदा डोळ्यांवरून फांदी जाता जाता त्याचे लक्ष समोर गेले.
एक मुलगी त्याच्याकडे क्रूरतेने बघत होती, फांदी त्याच्या डोळ्यावरून गेली आणि त्याने डोळे मिटले ते कायमचे.

इकडे ऋषि समुद्राच्या पूर्ण काठापर्यंत आलेला.
त्याने होडीमध्ये बघितले पण तिकडे सुद्धा कोणीच नव्हते.

ऋषिने मोबाईल काढला, पण तिघांचा फोन लागला नाही.

शेवटी कंटाळून परत जाण्यास निघाला, की तितक्यातच त्याला मागून पैंजनांचा आवाज आला.
त्याने मागे वळुन पाहिले, पण मागे कोणीच नव्हते,
तो मनाचा भास समजून तसाच चालत राहिला.

परत पैंजनाचा आवाज यायला लागला, पण आता मात्र फार जवळून आल्या सारखा वाटला.
आता मात्र ऋषि सुद्धा घाबरला, झाप झाप पावले टाकत जायला लागला.

लांबून त्याला त्यांचा टेंट दिसायला लागला, त्याला आता थोडं हायसं वाटलं, तो आता भर भर चालायला लागला, पण तितक्यात मागून जोरात धक्का देऊन त्याला खाली पाडले,
ऋषीने पटकन मागे बघितले पण मागे कोणीच नव्हते, आता मात्र तो पूर्णपणे घाबरु लागला.

धावत धावत टेंट जवळ येऊन पोहचला, पण टेंट जवळ कोणीच नव्हते,

मनाशीच विचार करायला लागला, जाऊ तर कुठे जाऊ, त्यांचे कॉल पण नाही लागत, त्यांना राजेश भेटला असेल का?
असंख्य प्राशन मनात घर करू पाहत होते.

शेवटीं न राहवून त्याने त्यांना शोधायचे ठरवले,
ऋषि निघाला त्यांच्या शोधात,
शोधत शोधत जंगल मध्ये येऊन पोहोचला.

तो चालत चालत त्या झाडापाशी येऊन पोहोचला, जिकडे राजेश आणि कमल ला मारून लटकवलेलं.

त्यांना बघून ऋषीचे हावभाव अजूनच बदलले, त्याला रडू कोसळत होते, मनातल्या मनात स्वतःलाच दोष देत होता इकडे येण्यासाठी.

ऋषि झटकन मागे वळला आणि तिकडून पळून जायला लागला,
पण काही फायदा नव्हता, त्याला तसेच कोणीतरी खाली पाडले, आणि पायाला झाडाच्या फांद्या गुंडाळून त्याला झाडावर उलटे लटकावले.

तितक्यात ऋषीला समोरून एक पांढरी आकृती येताना दिसली, एक बाई चालत येत होती.ऋषीने निट बघितले- 
‘स-स- सुजाता’

ऋषिचे डोळे वाटरले, भर थंडी मध्ये सुद्धा घामाच्या धारा वाहू लागल्या.

तिचे डोळे रागाने लाल झालेले, दात ओठ खत ऋषिकडे बघत ती म्हणाली
“हो मी सुजाता, आठवलं तर असेलच”

ऋषिच्या डोळ्यापुढे एक एक करून चित्र फिरत गेले.

२ वर्षांपूर्वी हे चौघे असेच फिरायला आणि पार्टी करायला ह्या बेटावर आलेले,
त्या वेळी तिकडे लाईटहाऊस किपर होता, 
त्याचं घर तिकडेच होतं आणि त्याच्या सोबत त्याची मुलगी असायची, घरचे गरीब होते, मुलगी अभ्यास करायला तिकडे नेहमी असायची.

त्या वेळी लाइट हाऊस किपर रात्रीच्या ड्युटी ला होता.

हे पार्टी वैगेरे करून पूर्णपणे टाईट होऊन मस्ती करायला लागले.
त्यांना समजले की तो ड्युटी ला गेला आहे आणि घरी ती मुलगी एकटीच आहे.
ह्या तिघांनी संधी साधून तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केला, तिच्या अब्रूचे आणि तिच्या शरीराच्या चिंधड्या केल्या.

ऋषि हे सर्व लांबून बघत होता पण त्या तिघांना अडवण्या खेरीज तो काहीच करू शकत नव्हता, नाहीतर  दारूच्या भरात त्यांनी ऋषीला सुद्धा मारायला पुढे मागे नसते बघितले,

सगळी घटना झाल्या नंतर त्या तिघांनी ऋषि ला धमकावले कोणालाही ना सांगण्या बद्दल

ऋषीला नाईलाज झाला आणि त्यानें ही गोष्ट कोणालाच कळवली नाही.

लाईट हाउस किपर ला त्याच्या मुलीचे मृत्यु सहन नाही झाले आणि त्याने सुद्धा त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली.

एक सुखी हसते खेळते परिवार त्या तिघांनी एका रात्रीत संपवले होते.

आणि हे सर्व लपवून ठेवून कुठे ना कुठे ऋषि सुद्धा जबाबदार होताच.

ऋषिचे हात पाय गळायला लागले, त्याने तीच्या कडे माफीची भीक मागितली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही,

ती त्याच्या जवळ आली, तिचे रूप आता खूपच विद्रुप झालेले, नाका तोंडातून रक्त येत होते,

तिने तिचे नखं वरती केली, आणि ऋषि च्या कपाळावर जोरात वार केला, ऋषिने वेदनेने एक जोरात किंचाळी मारली आणि बेशुद्ध झाला.

सकाळ झाली, 
आजूबाजूला लोक जमले, पोलीस आणि काही गावकरी मंडळी होती,
त्याने पोलिसांना काहीतरी बोलताना ऐकले, ते म्हणत होते,
“ह्या ३ डेड बॉडीस पोस्टमॉर्टेम ला न्या
आणि ह्या वेड्याला वेड्यांच्या इस्पितळात न्या”.

गावकरी सांगतात.
ज्या वेळी ऋषीला नेत होते तेव्हा ऋषि डोक्याला जखम दाखवून खूप विनवण्या करत होता मी वेडा नाहीय, पण त्याचे कोणीच ऐकले नाही.

Horror Stories In Marathi – अखेरचा प्रवास | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – द लास्ट शिफ्ट | Storyteller Rushi

तुम्हाला ही Marathi bhaykatha no. 10 – शेवटची रात्र

कशी वाटली हे comments करून आम्हाला सांगा. आशा आहे की तुम्हाला Horror Stories In Marathi- शेवटची रात्र ही भयकथा आवडली असेल.

जर तुम्हाला हि भयकथा – शेवटची रात्र आवडली असेल तर तुम्ही तुमच्या friends सोबत social networks जसे की Facebook, google, twitter इत्यादी वर share करा.

तसेच Like करा आणि ह्या आणि अश्या बऱ्याच कथा Audible स्वरूपात ऐकायच्या असतील तर आपल्या Storyteller Rushi च्या YouTube Channel ला भेट द्या.तुम्हाला सुद्धा तुमच्या Horror Stories किंवा तुमचे horror experience आमच्या पर्यंत पोहचवायचे असतील तर Email : Storytellerrushi@gmail.com यावर mail करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply