Horror Stories In Marathi – आजची हि Marathi Bhaykatha no. 1 – अखेरचा प्रवास हि दिघाटी रोड येथे घडलेली प्रवासात्मक कथा आहे.

Marathi Bhaykatha no. 1 – अखेरचा प्रवास (Horror Stories In Marathi)

” रात को होगा हंगामा, जब चमकेगा चंदामामा सूट बूट को गोली मारो, पहनके आजावो पजामा “मोठ्या आवाजात गाणी वाजवत रात्रीच्या शांततेला भंग करत आमची गाडी निघाली गोव्याला.

नुकतीच दिवाळीची सुट्टी लागलेली आणि परीक्षा पण संपलेली,विरंगुळा म्हणून कुठे फिरायला सुद्धा नव्हतो गेलो,अचानक एकाएकी ठरवलंच आणि गोव्याला जायचा बेत ठरला.

नेहमी प्रमाणे मी आणि माझे ३ मित्र अनिकेत, विघ्नेश आणि अजय सोबतीला.जेवण वैगेरे करून सर्व तयारी करून रात्री १० वाजता निघालो जाण्यास.

रमत गमत गाडी रस्त्यावर धावत होती गाडी ची मदार माझ्याच हातात होती.अनिकेत, विघ्नेश आणि अजय तर गाडी मध्ये बसल्या बसल्याच झोपी गेले,एव्हाना गाडी शहरातून निघून मुख्य हायवेला लागली.

आजूबाजूला गाड्यांची रहदारी आणि रस्त्याच्या कडेला छोटे मोठे हॉटेल्स, यांमुळे जरासं हायसं वाटत होतं.

तासाभराच्या प्रवासानंतर वडखळला पोहोचलो,वडखळच्या वळणावरून खरा प्रवास सुरु होणार होता.गाडी पेट्रोल पंपावर थांबली.पेट्रोल टाकून गाडी बाजूलाच एका टपरी वर थांबवली.

चहाचे दोन घोट पिऊन जरा तरतरी आणली कारण पुढचा प्रवास मोठा होता,

आता वडखळला मागे टाकून गाडी गोवा हायवेला लागली, तशी गाड्यांची रहदारी पण कमी झाली.

क्वचित एक – दोन कंटेनर दिसत किंवा मोठ्याने हॉर्न वाजवत एखादी गाडी ओव्हरटेक करून निघून जाई.

पाठीमागे तिघेपण त्यांच्या झोपेत तल्लीन झाले होते.

मग मीच गाण्याचा आवाज मोठा करत माझा एकटेपणा दूर करण्याचा अपुरा प्रयत्न करत होतो.

गोव्याला पोहोचायला अवकाश होता, कोणतीच घाई नव्हती.

गाडी संथ गतीने ७०-८० पकडत होती.

रात्रीचे १२ वाजून गेलेले, आता रस्ता आणखीनच सामसूम झालेला. गाड्यांची वर्दळ जवळ जवळ बंद झालेली.

रस्त्यावर पूर्णपणे काळोखाच साम्राज्य होतं, फक्त गाडीच्या हेडलाइटचा तो तेवढा प्रकाश दिसत होता.

सर्व काही सुरळीत चालू होते, की तेव्हाच अचानक गाडी ची हेडलाईट चालू बंद व्हायला लागली..

मी लाईट चालू करून परत बंद केली, तरी पुन्हा तेच प्रॉब्लेम..

लाईट सारखी चालू बंद होत होती.

आणि एका एकी गाडीच बंद पडली आणि त्या बरोबर गाडी ची लाईट सुद्धा..

जशी गाडीची लाईट बंद झाली तसा पूर्ण रस्ता काळोखा मध्ये गुडूप झाला..

एवढ्या सामसूम रस्त्या मध्ये अश्या ठिकाणी गाडी अचानक बंद पडणे म्हणजे नसलेल्या प्रॉब्लेम्स ना आमंत्रण देणे..

मी तिघांना पण हाक मारून उठवले आणि काय प्रॉब्लेम आहे हे बघायला बाहेर उतरलो.

बाहेर खूप अंधार होता आणि त्यात जबरदस्त थंडी पडलेली, गाडीच्या आतमधल्या ए. सी. चा थंडावा आणि बाहेर पडलेली थंडी ह्यात फारसा फरक नव्हता..

माझ्या ३ मित्रांव्यतिरिक्त रातकीड्यांचा आवाजही सोबतीला होता..

मी गाडीच्या बॉनेट जवळ गेलो आणि बॉनेट उघडून त्यावर मोबाइलचा Torch मारला..

जसा बॉनेट उघडला तसा धुराचा झपका माझ्या नाकांमध्ये शिरला,

तोंडावर हात देत बघितलं तर इंजिन मधून धूर येत होता..

मी पटकन गाडीच्या मागे जाऊन डिकी खोलली आणि त्यातून पाण्याचा छोटा ड्रम घेऊन गाडी च्या समोर गेलो,

कार्बोरेटर मध्ये पाणी टाकलं, तसं धूर यायचं बंद झालं..

लांब प्रवासाला जाताना असं काही होईल हे माहीतच असतं म्हणून नेहमी पूर्ण तयारी करूनच प्रवासाला निघतो…

बॉनेट बंद करून जसा गाडी कडे वळलो तेच माझं लक्ष गाडीच्या आतमधे गेलं..

गाडीच्या आतमध्ये ना अनिकेत होता, ना विघ्नेश आणि ना अजय..

थोड्या वेळ साठी तर अचंबितच झालो

मी पाणी टाकण्याच्या भानगडीत त्या तिघांकडे लक्षच नव्हतं दिलं, आणि हे अचानक गायब झालेले..

मी आजूबाजूला सगळीकडे बघितले पण ते कुठेच भेटले नाहीत..

मग मोबाईल काढून तिघांना फोन वर फोन केले,

रिंग वाजत होती पण कोणीच फोन नव्हते उचलत..

एवढ्या सुनसान जागे मध्ये अचानक गाडी बंद पडणे आणि त्यात हे तिघे एकाएकी गायब होणे, हे भीतीदायक तर होतेच पण त्या जास्त मला त्यांचा राग येत होता कारण त्यांना अश्या वेळी मस्करी करायची घाण सवय होती..

मी गाडीच्या मागच्या बाजूला त्यांना शोधायला गेलो, कदाचीत लघुशंका वैगेरे साठी गेले असावे..

पण दूर दूर पर्यंत कोणी चिटपाखरूही नव्हते..

हताश होऊन परत गाडी कडे वळणारच, की तितक्यात गाडीचा इंजिन चालू होण्याचा आवाज आला..

मी धावत जाऊन गाडी मध्ये बघितलं तर आतमधलं दृश्य बघून परत आश्चर्यचकीत झालो..

आतमध्ये तिघेही आरामात साखरझोपेत मग्न होते..

आता मात्र माझ्या रागाचा पारा चढलेला,

मी तिघांना पण उठवून त्यांच्यावर जरा ओरडलोच..

“अरे इकडे एका सामसूम जागेवर आपली गाडी बंद पडते, 

आणि तुम्ही कुठे गायब होतात रे, मागचे १० मिनिट तुम्हाला शोधतोय, 

आता मी गाडी ला सांभाळू की तुम्हाला”…

माझ्या ह्या बोलण्यावर तिघेही माझ्याकडेच अचंबित होऊन बघायला लागले..

आणि अजय माझं बोलणं कापत बोलू लागला-

‘अरे आम्ही इकडून हाललो पण नाही, गाडी चालू झाल्यापासून झोपलेलोच आहोत आणि तुला कुठे गायब झालेलो दिसलो’

त्यावर अनिकेत ने पण तीच प्रतिक्रिया दिली आणि म्हणाला,

‘तुला काहीतरी भास झाला असेल, तसही मगासपासून गाडी चालवून तू पण दमला असशील

एक काम कर! गाडी कुठे तरी हॉटेल किंवा ढाबा बघून थांबव, थोडं आराम करू आणि मग निघू पुढच्या प्रवासाला’

“मला नाही काही झालंय यार, 

ठीक आहे मी आणि आता नको कुठे गाडी थांबवायला”

मी पाण्याची बॉटल काढली, तोंडावर पाण्याचे शिंतोडे मारून परत गाडीत बसलो..

Horror Stories In Marathi – भानगड | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – अंधार | Storyteller Rushi

गाडी एकाच प्रयत्नात चालू झाली..

गाडी तशीच चालवत राहिलो,घडाळ्यात २ वाजलेले..

थोडे अंतर कापल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक मोठे बोर्ड लागलेले, त्यात ठळक अक्षरात लिहलेलं, “सावधान! कशेडी घाट सुरू, वाहने सावकाश चालवा”.

मी गाडीचा वेग कमी केला आणि सावध पणाने गाडी चालवायला लागलो..

गाडी वळणे घेत नीट घाट चढत होती,

थोडं वेळ जातंय तेच रस्त्याच्या कडेला परत एक बोर्ड दिसलं, 

“सावधान! 

कशेडी घाट सुरू, वाहने सावकाश चालवा”.

यावेळी मात्र मनात शंकेची पाल चुकचुकली!

लक्ष घडाळ्याकडे गेले, घडाळ्यामध्ये २ च वाजलेले..

मगाशी सुद्धा आपण इकडूनच सुरुवात केलेली, आणि जवळपास १५ मिनिटांनंतर परत हाच बोर्ड..

आणि वेळ सुद्धा तीच दाखवत होती, जेव्हा इकडून घाट चढायला सुरुवात केलेली..

मनाचा भ्रम समजून परत गाडी चालवण्या मध्ये गुंग झालो..

पण हा भ्रम तुटायला फार काळ लागला नाही, कारण थोड्या वेळाने परत तोच बोर्ड , तीच वेळ..

आता मात्र कळून चुकले होते की आपल्याला चकवा लागलाय,

चकवा बद्दल खूप ऐकलेलं आणि वाचलेलं सुद्धा

एखाद्या ठिकाणी चकवा लागल्यावर आपण सारखे सारखे त्याच जागेवर फिरत असतो, आणि चकवा लागल्यावर वेळ सुद्धा थांबते,

चकवा हा कोणी भूत नसून, भुतांचीच माणसांना फसवण्यासाठी केलेली एक पद्धत आहे, ह्यामध्ये तो व्यक्ती एकाच ठिकाणी फिरत राहतो..

विचार करूनच मनात धडकी भरली, सर्वांगावर रोमांच उभे राहिले, तेवढ्या थंडी मधे सुद्धा घामाने ओला चिंब झालेलो..

गाडी बाजूला लावली आणि सर्वाना जागे केले, आणि घडलेली सर्व हकीगत ऐकवली..

त्यांना पाहिले तर माझ्यावर विश्वास बसला नाही, पण माझी झालेली अवस्था बघून ते तिघेही चिंताग्रस्त झाले..

विघ्नेश ने गाडीचा दरवाजा उघडला आणि माझ्या बाजूच्या सीट वर येऊन बसला..

‘हे बघ घाबरू नकोस, आता आमच्या पैकी कोणीच झोपणार नाही, तू गाडी चालवत राह आणि कुठेच थांबु नकोस’

मी सुद्धा गाडी चालू केली आणि परत घाट चढायला लागलो..

ह्यावेळी ते तिघेही जागे होते..

गाडी घाट चढू लागली, थोडेच अंतर कापले असेल की अचानक पणे गाडी थोडी जड वाटायला लागली,

गाडी मध्ये आम्ही चौघेच होतो, पण तरीही एवढी जड येत होती जसं आमच्या गाडीला कोणीतरी पाठीमागून खेचत आहे..

मी गिअर कमी करून स्पीड वाढवला आणि परत गिअर टाकून गाडीचा स्पीड वाढवला..

आता गाडी पाहिले सारखी झाली..

मगाशी जिकडे चकवा लागलेला, त्या जागेच्या पण पुढे आलेलो,

थोडंस हायसं वाटलं, पण तरीही काहीही करून हा घाट लवकरात लवकर पार करायचं होतं..

थोडं पुढे गेलो तर रस्त्याच्या कडेला परत एक बोर्ड दिसला..

आता मात्र आम्ही सर्व घाबरलो,

जवळ जाऊन बघितलं तर त्यावर लिहले होते,

“कशेडी घाटाची हद्द समाप्त”

एवढा वेळ जीव मुठीत धरून गाडी चालवत होतो, हा बोर्ड बघून कुठे जीवात जीव आला..

आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर एक हास्याची लहर उमटली..

घाट पार करून परत मुख्य हायवेला लागलो..

पुढे चिपळूणला आल्यावर तिकडून २ रस्ते दिसत होते, एक म्हणजे मुख्य रस्ता आणि दुसरा म्हणजे ऊपमार्ग..

मित्रांना तर ह्याबद्दल कल्पना नव्हती,

आणि मी सुद्धा हा ऊपमार्ग पहिल्यांदाच बघत होतो..

मोबाईल काढून मॅप वर रस्ता शोधायला लागलो पण आश्चर्याची गोष्ट की कोणाच्याच मोबाईलला सिग्नल नव्हता येत..

कदाचित हा ऊपमार्ग शॉर्टकट असेल, ह्या आशेने गाडी त्या रस्त्याला वळवली..

हा रस्ता, मुख्य रस्त्या पेक्षा जरा जास्त सामसूम आणि भकास वाटत होता..

रस्त्या वरचे प्रकाशाचे खांब तर बंद पडून तुटायला आलेले..

रस्त्याच्या आजूबाजूला जंगली भाग होता..

मुख्य रस्त्याला एखाद – दुसरी गाडी तरी दिसत होती,

इथे मात्र ते सुद्धा नव्हतं..

गाडीच्या हेडलाईट च्या प्रकाशात तो रस्ता एका मोठ्या अजगरा सारखा भासत होता..

Horror Stories In Marathi – द लास्ट शिफ्ट | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – दिघाटी रोड | Storyteller Rushi

मी गाडीचा वेग स्थिर ठेवला..थोडं पुढे जातो, की तेच समोर दूरवर गाडी च्या प्रकाशा मध्ये रस्त्याच्या कडेला काहीतरी आकृती नजरेला पडली..

पहिले तर वाटलं कोणी प्राणी वैगेरे असेल, पण जसं जवळ गेलो, तसं ते अजूनच स्पष्ट दिसायला लागलं..

६ फूट लांब, ५ फूट उंच असा चार पायांवर एक माणूस आमच्या गाडी कडे टक लावून रागाने बघत होता, त्याचा चेहरा सुजलेला, हेडलाईट च्या प्रकाशा मध्ये त्याचे डोळे चमकत होते आणि त्याच्या समोर एक प्राणी मरून पडलेलं, ते ४ पायांवर जे कोणी माणूस होते ते त्या प्राण्याला खात होतं, सगळीकडे नुसतं रक्त सांडलेले..

समोरच दृश्य पाहून माझी तर जी होती नव्हती ती ताकत सुद्धा निघून गेली..

अनिकेत, विघ्नेश, अजयने हे दृश्य पाहताच त्यांच्या तोंडातून किंचाळी आली आणि मला ते जोरात ओरडायला लागले,

“ऋषि गाडी पळव, फास्ट..अजून फास्ट..

थांबुच नको”…

मी सुद्धा ते भयावह दृश्य बघून खूप घाबरलेलो पण तरी स्वतःला वेळीच सावरून गाडीचा वेग वाढवला..

गाडी थोडी पुढे जाते ना जाते, तेच जे नव्हतं व्हायला हवं, तेच झालं गाडी हिसके देत देत बंद पडली.. गाडी चा प्रकाश देखील बंद झाला..

आता आमच्या समोर होता एक सामसूम रस्ता जो कधी संपत नव्हता, आणि पाठीमागे ते भयानक प्राणी जे आम्हाला इकडून जाऊन देणार नव्हते..

इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आलेली,

मनातल्या मनात स्वतःलाच दोष देत होतो की उगाच मुख्य रस्ता सोडून ह्या रस्त्यावरून आलो..

आता आमच्याकडे गाडीतच थांबून मदतीसाठी कोणी दुसरी गाडी किंवा कंटेनर येतोय का ह्याची वाट पाहण्या खेरीज दुसरा पर्याय नव्हता..

बाहेर उतरून काय प्रॉब्लेम आहे, हे बघण्याईतकी हिम्मत सुद्धा राहिली नव्हती..

खूप वेळ झाला तरी कोणतीच गाडी येत नव्हती,

आणि सर्वांचे मोबाईलचे सिग्नल तर हा रस्ता पकडल्या पासून गायबच झालेले..

कोणी मदतीसाठी येईल ह्याची चिन्ह ही दिसत नव्हती..

पण एवढ्या वेळेमध्ये, ते मागचे ४ पायांवरचे प्राणी सुद्धा काही हालचाल दाखवत नव्हते,

नाहीतर एव्हाना त्याने आम्हाला गाठलं असतं..

Horror Stories In Marathi – षंढ | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – हा सागरी किनारा | Storyteller Rushi

शेवटी हिम्मत करून मी आणि विघ्नेश, गाडीला काय प्रॉब्लेम झालाय हे बघायला उतरलो..

उतरल्या उतरल्या एक थंड हवेची झुळूक मानेवरून गेली..

विघ्नेश ने मोबाईल टॉर्च मारली, मी बॉनेट उघडून पाहू लागलो काय प्रॉब्लम आहे ते,

पण ह्या वेळी कोणताच धूर वैगेरे नव्हता येत,

मग नक्की झालंय तरी काय..

विचारांमध्ये गुंग होतो की तितक्यात अजय आणि अनिकेत च्या जोरात किंचाळण्याचा आवाज आला..

आम्ही दोघे पण काय झालंय बघायला गाडी कडे वळलो, तर गाडीत दोघे पण नव्हते..

मग आम्ही गाडी च्या मागे बघितलं आणि समोर जे बघितलं, ते पाहून दोघांची पण घाबरगुंडी उडाली..

तो मघासचाच ४ पायांवरचा प्राणी त्या दोघांना त्याच्या दोन्ही हाताने ओढत, घासत नेत होता..

आणि ते दोघे जिवाच्या आकांताने आम्हाला हाक मारत होते..

आमचे हात पाय थर-थरु लागले..

काय करावे काहीच सुचत नव्हते,

पण आमच्या मित्रांना असे त्या राक्षसाच्या हातात पण देऊ शकत नव्हतो..

आम्ही ना आव बघितला ना ताव

हातात जे भेटेल दगड, काठी वैगेरे घेऊन त्या राक्षसावर धाव घेतली..

त्या दोघांचे ओरडणे चालूच होते..

त्यातच माझा माझ्या हातावरचा ताबा सुटला आणि माझ्या हातात जो दगड होता तो त्याच्या दिशेने भिरकावला..

दगड जाऊन सरळ त्या राक्षसाच्या डोक्यावर लागला..

दगड लागताच त्याने मोठी कर्णकर्कश आरोळी ठोकली आणि पाठीमागे वळला..

त्याचा चेहरा रागाने लालबुंद झालेला,

त्याचे दात म्हणजे सुळे, चेहऱ्यावर खूप ठिकाणी घाव होते आणि त्या घावांमधून त्याचे मांस लोंबत होते,,

हे किळसवाणे दृश्य बघून काही वेळा साठी तर मी बर्फ़ासारखा थंडच पडलो..

त्याने अनिकेत आणि अजय ला तसंच खाली टाकलं आणि माझ्याकडे वळला..

माझ्याकडे धाव घेताना त्याने परत आरोळी ठोकली आणि माझ्या मागे धावू लागला..

हीच संधी साधून अनिकेत आणि अजय पण तिकडून पळत सुटले

मी रस्त्यावरून धावत होतो, मागे वळून बघण्याची हिम्मत नव्हती..

तो राक्षस ४ पायांवर उड्या मारत माझ्यावर झेपावत होता..

धावता धावता मी बाजूच्या जंगलात गेलो..

खूप आतमध्ये आल्यानंतर कुठे त्याचा आवाज यायचा बंद झाला..

असं वाटलं तो गेला असेल, म्हणून परत माघारी फिरलो आणि लपत, वाचत जिकडे गाडी होती त्या दिशेने जायला लागलो..

अनिकेत,अजय, विघ्नेश तिघांचा पण काहीच पत्ता नव्हता..

गाडी जवळ आल्यावर रस्त्याच्या दुसर्या बाजूच्या जंगलामधून विघ्नेशची किंचाळी आली..

क्षणाचाही विलंब न करता मी आवाजाच्या दिशेने धाव ठोकली..

जाता जाता रस्त्यात अजय आणि अनिकेत सुध्दा भेटले..

ते सुद्धा किंचाळी ऐकूनच आलेले..

जसे आम्ही जवळ पोहोचलो तसं समोर बघितलं..

शेकोटी पेटवलेली त्या शेकोटी भोवती त्या एका राक्षसा सारखे अजून ५ जन होते..

त्या राक्षसांनी विघ्नेश ला एका झाडाला बांधून ठेवलेलं..

आम्ही येण्याची चाहूल लागताच त्यांचे लक्ष आमच्याकडे गेले..

सर्व जण सारखेच दिसत होते,

चेहऱ्यावर तोच राग, तोच द्वेष आणि चेहरा पूर्ण फाटलेला..

त्या आगीच्या प्रकाशामध्ये अजूनच भयावह वाटत होता..

आणि त्यांचे आसुरी हास्य ऐकून, होते – नव्हते अवसान सुद्धा गळून गेलेले..

आम्हाला कळून चुकले होते की आता इकडून बाहेर पडायचे सर्व रस्ते आमच्या साठी बंद झालेले..

त्यांमधले तिघे जण आमच्यावर हळू हळू झोपावत होते..

आम्ही एकमेकांचा हात पकडून एक एक पाऊल मागे टाकत होतो..

आता पर्यंतचे सर्व पाप – पुण्य एका क्षणामध्ये डोळ्यांसमोरून जात होते..

आमची ह्या रस्त्याने येण्याची चूक, आणि ती किती महागात पडू शकते,

पण ह्या सर्वांचा शोक करण्याची आता वेळ नव्हती..

ते राक्षस घाईने आमच्या कडे झेपावत होते..

आम्ही तिघे मागे वळून धावणारच, की तितक्यात त्यांनी आमच्या पायाला पकडून आम्हाला खाली पाडले..

आम्हाला ओढत घेऊन जिकडे विघ्नेश ला बांधलेला तिकडे बांधला..

आम्हाला बांधल्या नंतर त्या सर्वांनी एकच किंचाळी मारली..

त्या किंचाळीचा आवाज इतका तीव्र होता, की आमचे कान बधिर होण्याचेच बाकी होते..

जोरात किंचाळी मारत ते आमच्यावर झेपावले,

ते त्यांचे सडलेले चेहरे बघून आमची सुद्धा किंचाळी निघाली आणि ती पूर्ण आसमंतात भिनभिनली..

ते भयानक प्रसंग बघून आम्ही चौघेही जागेवरच बेशुद्ध झालो..

जेव्हा जाग आली, तेव्हा सकाळ झालेली..

आम्ही डोळे उघडले..

समोरची शेकोटी विझून तिकडे राख जमलेली..

कालचा प्रसंग आठवून अंगावर काटे उभे राहिले..

बाजूला बघितलं तर तिघेही नुकतेच जागे झालेले..

आजूबाजूला नुसता गोंगाट आणि गर्दी होती,

सायरन चा आवाज कान बधिर करत होता..

तिकडून उठलो आणि गर्दी च्या ठिकाणी गेलो..

पोलीस होते आणि आमच्या चौघांच्या पण घरचे आलेले,आणि ते सर्व आमच्या ४ मृत शरीरांकडे बघून रडत होते.

Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 1| Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 2 | Storyteller Rushi

तुम्हाला ही Marathi bhaykatha no. 1 – अखेरचा प्रवास

कशी वाटली हे comments करून आम्हाला सांगा. आशा आहे की तुम्हाला Horror Stories In Marathi – अखेरचा प्रवास ही भयकथा आवडली असेल.

जर तुम्हाला हि भयकथा – अखेरचा प्रवास आवडली असेल तर तुम्ही तुमच्या friends सोबत social networks जसे की Facebook, google, twitter इत्यादी वर share करा. तसेच Like करा आणि ह्या आणि अश्या बऱ्याच कथा Audible स्वरूपात ऐकायच्या असतील तर आपल्या Storyteller Rushi च्या YouTube Channel ला भेट द्या.

तुम्हाला सुद्धा तुमच्या Horror Stories किंवा तुमचे horror experience आमच्या पर्यंत पोहचवायचे असतील तर Email : Storytellerrushi@gmail.com यावर mail करून आम्हाला नक्की कळवा.कशी वाटली हे comments करून आम्हाला सांगा. आशा आहे की तुम्हाला Horror Stories In Marathi – अखेरचा प्रवास ही भयकथा आवडली असेल.

Leave a Reply