आजची कथा Horror Stories In Marathi – हाकामारी ही आपल्या “मैफल” सिरिज् मधली दुसरी कथा आहे.ह्यात ऋषिकेश सोबत घडलेला एक अविस्मरणीय अनुभव तो सांगत आहे.त्याला हाकामारी कशी दिसली, त्या गावात ह्या अमानवी घटनांची शृंखला कशी सुरू झाली, हे सांगितलं आहे.

हे ह्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत.भुताटकी मैफल ह्या नवीन सिरीजच्या रुपात आपण आपल्या बालपणाच्या शेकोटी भोवतीच्या भयकथा ऐकणार आहोत.

Marathi Bhaykatha no. 19 – हाकामारी (Horror Stories In Marathi)

आणि आम्ही कसे बसे त्या रहस्यमयी खेकड्यांपासून वाचलो.
तितक्यात त्या शांततेला भंग करत मी म्हणालो,
अरे हे तर काही नाही, खरा भयानक किस्सा तर एकदा माझ्या सोबत घडला.
माझं हे वाक्य पूर्ण करायची खोटी, की सगळ्यांची नजर माझ्यावर खिळली.
एक एक करून मी सगळ्यांकडे बघितलं, त्यांनी काही बोलायच्या अगोदरच त्यांच्या बोलक्या डोळ्यांवरून त्यांना काय बोलायचं आहे, हे मी हेरलं.
ही माझ्या मित्राच्या गावाची गोष्ट आहे.
मी जसं बोलायला सुरुवात केली, तसे सर्व जण माझ्या गोष्ट सांगण्याकडे लक्षपूर्वक ऐकू लागले.
 
गोष्ट अलीकडचीच आहे, माझ्या लहानपणीचा मित्र हृतिक, आम्ही सगळे त्याला रुत्या म्हणत. 
 तो दर वर्षी प्रमाणे ‘मे’ महिन्याच्या सुट्टी मध्ये गावाला जात असे, 
जवळचा मित्र असल्या कारणाने त्याच्या तोंडून अगणित वेळा त्याच्या गावचे, म्हणजेच कोकणाचे कान तृप्त करणारे व मनाला सुखावणारे वर्णन ऐकले होते.
माझ्या जवळचे आहेत त्यांना सांगायला नको मला कोकण किती आवडतो ते.
योगायोग म्हणजे नुकतीच दहावीची परीक्षा येऊन ठेपली होती.
नेहमी प्रमाणे आम्ही संध्याकाळी त्याच्या घराच्या गच्चीवर अभ्यास करत बसलेलो, आणि त्याने पुन्हा एकदा गावाचा विषय काढला, त्याचा हा विषय काढायची खोटी, आणि मी लागलीच त्याला माझ्या मनातली इच्छा बोलून दाखविली.
“काय रे, दर वेळी मला गावातल्या गोष्टी सांगत असतो, निळाशार समुद्र, आंब्या- फणसाची घनदाट झाडं, चोहोबाजूला रस्त्यावर जांभळाचा सडा.
तुला माहिती आहे मला निसर्गावर जेवढं प्रेम आहे तेवढं क्वचितच कोणत्या गोष्टीवर असेल.
नेहमी नेहमी तू तुझ्या ह्या निसर्गसंपन्न गावाबद्दल सांगत असतो, बघ आता गावाचे वर्णन करताना मी सुद्धा मनाने नकळत गावात फिरून आलो
मग विचार केला एकदा मी सुद्धा येऊन बघतोच गावाला तुझ्या.
ने की कधीतरी गावाला.

Horror Stories In Marathi – हौंटेड हायवे | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – झपाटलेलं रेल्वे स्टेशन | Storyteller Rushi

‘अरे मग चल ना कधीही, तुला कुठे नकार दिला, जसा तो माझा गाव तसा तुझंही, आता आपली परीक्षा संपल्यावर जाणारच आहे तेव्हा ये मग’.
मी ठीक आहे म्हणून घरी परतलो, हृतिक बालमित्र असल्याने त्याचे माझ्या घरी येणे जाणे असायचे, त्यामुळे त्याच्यासोबत गावी जाण्यासाठी घरच्यांची परवानगी मिळवायला मला जास्त कष्ट लागले नाही.
चला, लहानपणीपासूनची इच्छा पूर्ण होणार.
मी खुश होतो. पण माझा हा आनंद माझ्यासाठी आयुष्य भरासाठीचा दुःस्वप्न बनून राहील हे त्यावेळी माहीत असतं, तर पुढच्या खूप साऱ्या घटना टाळता आल्या असत्या.
पण ते म्हणतात ना, ह्या पृथ्वीतलावर असा कोणताच मानव, पशु-पक्षी नाही ज्याला नियतीच्या नियमांच्या पुढे जाता येईल.
परीक्षा संपली, सगळे पेपर खूप चांगले गेले.
शेवटच्या पेपरच्या दिवशी हृतिक आणि मी सोबतच घरी गेलो, आता पूर्णपणे मोकळा होतो, मनाने, शरीराने.
आता फक्त एकच ओढ होती, कोकण.
परीक्षा संपल्याच्या पुढच्याच आठवड्यात हृतिकच्या घरच्यांनी गावाला जायचा बेत केला.
“उतावळा नवरा गुढग्याला बाशिंग” ह्या म्हणी प्रमाणे मी २ दिवस आधीच गावाला जायची सगळी तयारी, पॅकिंग वैगेरे करून बसलेलो.
आणि तो दिवस आलाच, गाडी सकाळी सहाची होती.
घरातली प्रायव्हेट कार असल्याकारणाने ट्रेन किंवा बसची रहदारी सहन करायला लागणार नव्हती.
ठरल्या प्रमाणे सकाळी बरोबर सहाला गाडीने मुंबई सोडली.
मजल दरमजल करत संध्याकाळी पाचच्या दरम्यान आम्ही गावाला येऊन पोहोचलो.


गावात प्रवेश केल्या केल्या मला हृतिकने सांगितलेल्या त्याच्या गावाच्या वर्णनांच्या शब्दान शब्दा ची आठवण आल्यावाचून राहिली नाही.
ही गर्द हिरवी वनराई, नारळ, आंबा, फणस ह्यांची झाडं, त्या झाडांवर पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, रस्त्यावर जांभूळ, करवंद ह्यांचा सडा, लांब कोठेतरी पेटवलेल्या गावातल्या चुलीचा वास.
गावाला निसर्गाचा वरदहस्तच लाभलंय जणू.
तब्बल अकरा तासांच्या प्रवासाने थकलेलो आम्ही घरी पोहोचल्या पोहोचल्या आधी जेवणावर यथेच्छ ताव मारला.
हृतिकच्या काकांचं घर होतं ते, घरात काका, काकी आणि त्यांची मोठी मुलगी आरती. आम्ही तिला आरू ताई म्हणत.
असं हे त्यांचं छोटं, पण सुखी कुटुंब.
गावाला येताना फिरण्याबाबत खूप विचार केलेला, पण जेवल्या नंतर प्रवासाचा क्षीण काही केल्या कमी होईना, मी हृतिकला लागलीच सांगितलं, “आज खूप दमलो आहे यार, उद्या सकाळी जाऊ हुंदडायला”.
त्याने देखील ते मान्य केलं.
मात्र त्या नंतर रात्रीचं जेवण कधी केलं आणि अंथरुणात पडल्या पडल्या कधी झोपी गेलो, हे सकाळी उठल्या नंतर सांगताच आले नाही.
असो, ‘रात गयी, बात गयी’.

सकाळ झाली.
माझी उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली, सकाळच्या नाश्त्याची पण वाट न बघता आम्ही दोघे निघालो.
तसंही नाश्त्याची गरज नव्हतीच म्हणा, आम्ही रस्त्यातच आंबे, करवंद, चिंच, जांभूळ इ. फळे एवढी खाल्ली की बस.
पूर्ण गाव हिंडलो, लोकांच्या ओरडण्यावर कानाडोळा करून त्यांच्या झाडांवरचे आंबे पाडले, चिंचेच्या झाडावर चढुन चिंच काढली, काही लोकं फक्त घरातूनच आमच्यावर ओरडत तर काही जण काठी घेऊन मारायला धावत, पण तसं चालायचंच, लहानपणी अशी मजा केली नाही तर काय केलं?
सरतेशेवटी दमून आम्ही गावाला लागूनच असलेल्या समुद्रकिनारी विश्रांती साठी आलो.
हृतिक तर बीच वरच आडवा झाला.
इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि माझ्या मनातली शंका मी त्याच्याजवळ बोलून दाखवलीच.
“एक विचारायचंय रुत्या, जर रागावणार नसशील तरच”.
‘काय बोललास? रागावणार? आणि मी? तू कधीपासून हे विचार करायला लागला रे, विचार बिनदास्त पणे’.
“म्हणजे तसं मला गावाबद्दल आवड आहे आणि ह्यात तुमच्या किंवा कोणाच्या गावाला कमी लेखण्याचा प्रश्न येत नाही, पण माझ्या मित्रांकडून वैगेरे म्हणा, किंवा माझ्या ओळखीच्या माणसांकडून मी कोकण किंवा कोकणच्या गावाबद्दल एका वेगळ्याच विषयाची चर्चा करताना बघितलंय, कोकण म्हणजे भूत, भूतांचे खूप सारे प्रकार असं काही खूप ऐकलंय
ह्यात किती तथ्य आहे देव जाणो, पण”
‘पण काय?’


“पण आपल्या गावात तसं काही?”
माझी नजर हृतिक वर गेली, हृतिकचा स्वभाव मुळी मस्करी चा, माझ्या ह्या दुधखुळ्या प्रश्नाला तो खळ खळुन हसेल, असा माझा ग्रह झाला, पण झाले उलटेच, हसण्याचे सोडाच, पण सकाळपासून हिंडून, दमून सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता होती, पण माझ्या ह्या प्रश्नाने ती सुद्धा गेली आणि त्याची जागा आता गंभीरपणाच्या भावाने घेतली.
एक मोठा सुस्कारा सोडून तो पुढे सांगू लागला.
“हो आहे, म्हणजे बाकीच्या गावांप्रमाणे पूर्वी असं काही नव्हतं, ही गोष्ट अलिकडचीच आहे, 
तशी ही घटना ५ वर्षांपूर्वीची आहे, आपल्या गावाच्या वेशीवर एक जुना वाडा आहे, त्या वाड्यात एक जोडपं राहायला आलेलं, 
आपल्या गावातले खूप सारे कुटुंब मुंबई किंवा शहारा ठिकाणी स्थायी झाले आहेत, नोकरी निमित्त म्हणा किंवा अन्य कारणांसाठी, पण ते असे सुट्टीच्या दिवशी गावात येत, थोडे दिवस राहत आणि परत आपापल्या घरी जात.
पण हे जोडपं त्यामधलं नव्हतं, आपल्याच काय, आजूबाजूच्या गावातले देखील वाटत नव्हते.
कोठून आले, कसे आले, त्यांचं घर कसं चालायचं,
कोणालाही काही माहिती नव्हती, कदाचित कोणाला माहीत करून घ्यायचंही नव्हतं.
दिवसांमागून दिवस गेले, आणि लोकांना तिकडून रात्रीचे विचित्र अनुभव यायला लागले,
जे गावकरी कामानिमित्त बाहेर जाऊन रात्री गावात यायला लागले त्यांना त्या घरातून चित्र विचित्र आवाज ऐकू येऊ लागले, कधी त्या वाड्यात रात्रीचा प्रकाश दिसायचा, तर कधी सौम्य आवाजात किंकाळ्या ऐकू यायच्या.
घटकांमागून घटका गेल्या, हळू हळू लोकांना समजायला वेळ नाही लागला, की ते जोडपे जादूटोणा, ब्लॅक मॅजिक असल्या गोष्टींच्या आहारी गेले होते.

Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 2 | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – शेवटची रात्र | Storyteller Rushi

आपल्या गावात असल्या गोष्टी पहिल्यांदाच घडत होत्या, गावावर जणू एक प्रकारचे संकटच.
पण हे कधी न कधी थांबायलाच हवं होतं, 
आंब्याने भरलेल्या पोतलीतला एक आंबा खराब निघाला तर तो त्याच्या आसपासच्या आंब्याना सुद्धा खराब करतो, त्याकडे दुर्लक्ष केलं तर परिणामी पूर्ण आंब्याची पोतळीच खराब आंब्यानी भरून जाते.
त्यांचा घर भलेही गावाच्या बाहेर होता, पण त्यांच्या वाईट कृत्यांची (वाईट म्हणनेच योग्य ठरेल, त्याशिवाय पुढच्या घटना घडल्या नसत्या), ते जे काही करत होते त्यांची झळ गावापर्यंत पोहोचत होती.
पहिले तर लोकांनी ह्याकडे दुर्लक्ष केले, पण हा प्रकार प्रमाणाच्या बाहेर जाऊ लागला, पाणी डोक्यावरून वाहू लागले.
गावामध्ये अमानवी अनुभवांची शृंखला सुरू झाली.
गावात रात्री येणारे किंवा रात्री गावातून बाहेर जाणाऱ्या लोकांना गावाच्या वेशीवर कोणीतरी पहारा ठेवतो आहे असं दिसले.
काही लोक तर म्हणाले ते एक खविस आहे.
सुरुवातीला ते जे कोणी होते(खविस?) ते गावाच्या वेशीवर अगर गावाच्या बाहेरच दिसायचे, पण कालांतराने त्याचा गावात प्रवेश झाला, कसा झाला कोणालाच माहीत नाही.
आता लोकांना रात्री अपरात्री भर गावातही तो दिसू लागला.


ज्या लोकांनी त्याला बघितलं आहे त्यांच्याकडूनच ऐकलं की तो चांगला बारा -साडे बारा फूट उंचीचा, म्हणजे आपण एकमेकांवर उभे राहून जेवढी उंची होईल, त्याही पेक्षा जास्त.
लोकं पुरती घाबरली, रात्रीच्या प्रहरी घराबाहेर पडेनाशी झाली.
तो गावात कुठेही दिसायला लागला, कधी ह्या गल्लीत, कधी त्या माळरानावर.
पण हद्द तर तेव्हा झाली, जेव्हा रात्री सगळे झोपल्यानंतर लोकांच्या दरवाजावर ठकठक व्हायला लागली.
रात्री-अपरात्री केव्हाही येऊन तो दार वाजवायचा, जे लोक दरवाजा उघडायचे, त्यांचा दुसऱ्या दिवशी काही थांगपत्ता नसायचा.
आणि हे प्रकार जवळ जवळ रोज व्हायला लागले.
आता मात्र गाव वाल्यांची पाचावर धारण बसली.
आधीपर्यंत तरी तो कोणाला काही करत नव्हता, पण आता तो लोकांच्या घरात शिरू पाहत होता, आणि हिच गोष्ट सहन करण्यापलीकडची होती.
गेली वर्षांनोवर्षं गावात एकदाही अश्या घटना घडल्या नव्हत्या, 
गावाबाहेरच्या बंगल्यात ते जोडपे आले काय आणि गावावर हे संकट कोसळले काय.
परिणाम व्हायचा तो झाला, गावकरी खूप चिडले, ते जे काही करायचे ते त्यांच्यापुरते मर्यादित होते तोपर्यंत ठीक होतं.
पण आता त्यांनीच हे संकट गावावर आणले होते.
लोकांची खात्री पटली. आता त्यांना इकडे ठेवून काहीच साध्य होणार नव्हतं.
आपले गावकरी चांगले म्हणून त्यांनी सर्वात आधी त्यांना नीट समजावून सांगितले.
त्या समजावण्याचा त्यांच्यावर किती परिणाम झाला देवालाच ठाऊक, त्यांनी आमच्या बोलण्याकडे जणू दुर्लक्षच केलं आणि त्यांचं काम त्यांनी चालूच ठेवले.


परिणामी आम्हाला त्यांचं हे वागणं पोलिसांना सांगण्या वाचून गत्यंतर नव्हतं.
गावात पंच सभा झाली, सगळ्या गावकर्यांनी मिळून त्यांच्यावर बहिष्कार टाकायचं ठरवलं आणि त्यांची कंपलेंट पोलिसात करायची.
दुसऱ्या दिवशी सकाळीच गावातल्या प्रौढ व्यक्तींनी पोलिस चौकीत जायची तयारी करून जायला निघाले.
ते जसे गावाबाहेर पडले, तसं त्यांच्या दृष्टीस तो त्यांचा वाडा पडला. वाडा लांबून पाहूनच इतका भकास वाटत होता, थोडं जवळ जाताच त्यांना त्यामागचं कारण ही समजलं, वाडा पूर्णपणे काळपट झालेला, काळपट कसला? वाडा पूर्णपणे जाळून गेलेला, वाड्याच्या आजूबाजूचं सगळं गवत जळून खाक झालेलं.
पण हे झालं कसं?
अगदी दोनच दिवसांपूर्वी जेव्हा ते ह्या वाड्यात त्या दाम्पत्यांना समजवायला गावकरी आलेले, तेव्हा तर असं काहीच नव्हतं.
एका रात्रीत तो वाडा नेस्तनाबूत झालेला.
नक्कीच काहीतरी भलतंच होऊन गेलेलं आहे.
त्यांनी पोलिसात जाण्याचा विचार साध्यापुरतं बाजूला सारून ते पून्हा गावात आले.
खूप चर्चा झाल्या,
काही लोकं म्हणायला लागले, त्यांची विद्या त्यांच्यावरच उलटली, काही लोकं म्हणत होते त्यांनी जे खविस तयार केलेलं, त्यानेच हे केलं असेल.
जैसे कर्म, तैसे फळ.
सत्य काहीही असो, त्यांचा गावाला असणारा धोका सध्या तरी टळलेला.
गावकरी फार खुश झाले, पण हा आनंद फार काळ टिकला नाही.
इकडे आड तिकडे विहीर अशी गत झाली.
त्या दिवसानंतर ते खविस का कोण, ते परत कधीच कोणालाही दिसले नाही, मात्र थोड्याच दिवसानंतर एक वेगळंच संकट गावावर घुमू लागलं.
ह्या शृंखलेची सुरुवात झाली माझ्या बाबांपासून.

ते शेतावरून कधी कधी रात्री उशिरा घरी येत.
(खविसच्या प्रकरणापासून त्यांनी कधी उशीर केला नव्हता).
मात्र ते घर जळून त्या प्रकरणाचा शेवट झाल्या नंतर बाबा पुन्हा एकदा आधिसारखे उशिरा येऊ लागले.
त्या दिवशी सहज रात्रीच्या १ च्या सुमारास ते घरी येत होते, तितक्यात त्यांना पाठून, म्हणजे शेतातून माझी (माझ्या आवाजाची) हाक आली.
प्रत्यक्षात मी तेथे नव्हतोच, मी घरी झोपलेलो.
पण सेम माझ्याच आवाजात कोणीतरी बाबांना हाक मारलेली.
ते थोडे गडबडले.
त्यांना भास झाला असे समजून ते परत घरी यायला निघाले,
पण पुन्हा तेच, ह्यावेळी माझ्या आईच्या आवाजात हाक आली.
आता मात्र त्यांना वाटले इकडे नक्कीच काहीतरी वेगळं आहे.
इकडून लवकरात लवकर घरी जावं लागेल.
देव ह्यावेळी बाबांच्या सोबत होता. घरी येईपर्यंत त्यांनी पाठी वळून एकदा पण पाहिले नाही, ते सुखरूप घरी आले.
आणि पुढच्या दिवशी आम्हाला घडलेली हकीगत सांगितली.
त्या नंतर बाबा कधीच रात्रीचे शेतावर नाही गेले.
बाबांनी ही गोष्ट गावात कोणाला सांगितली नव्हती, साहजिकच त्या दिवसानंतर अनेकांना असे ठराविक अनुभव यायला लागले.
लोकांना त्यांच्या ओळखीच्या माणसांच्या हाका ऐकू येऊ लागल्या.
घरात, घराच्या बाहेर सगळीकडे.
लोकं म्हणायला लागली, हे तेच वाड्यामधल्या बाईचे भूत असणार.
हाकामारी .

जे लोकं त्या हाकेला साद द्यायचे, ते एकाएकी गावातून नाहीसे होत गेले.
त्या बाईच्या रूपात तिची आत्मा ह्या गावावर घिरट्या घालू लागली.
काही लोकं स्थलांतर झाले.
आपल्याच गावाच्या डोक्यावर एखादा काळा ढग यावा, तसं हे संकट फक्त आपल्याच गावावर घोंगवत होते.
त्यानंतर काय झालं हे कळायच्या आधी आम्ही देखील गाव सोडलं.
ही सगळी हकीगत ऐकताना माझ्या शरीरावरचे केस न केस ताठ झालेले.
लहानपणी ऐकिवात असलेले किस्से, किंवा गाव आपण आता प्रत्यक्षात ऐकत होतो.
म्हणजे गावात अजूनदेखील हाकामारी चे संकट टळले नव्हते.
माझे ह्या गावा बद्दलचे आकर्षण आणि इकडे राहण्याचे विचार त्याच क्षणी बदलून गेले.
घरी येता येता कोणीही एकमेकांशी बोललो नाही.


रात्री ८ वाजताच सगळं गाव झोपेच्या अधीन झालं.
सगळ्यांच्या घरा समोरचे दिवे मालवले गेले.
आमच्या घरी सुद्धा झोपेची तयारी व्हायला लागली.
शहरी भागात राहणारा मी, इतक्या लवकर झोप येणे तर माझ्यासाठी असंभव गोष्ट होती.
वेळ जाण्यासाठी मी पुस्तक काढलं आणि माझ्या रूम मध्ये जाऊन वाचू लागलो.
आज शेरलॉक त्या गुन्हेगारांना सगळ्यांसमोर आणणार होता, खूप उत्सुक होतो.
तासभर झाला असेल, की मलाही डुलक्या येऊ लागल्या.
मी पुस्तक तसेच बाजूला ठेवले आणि जसा पडलेलो तसाच झोपेच्या आहारी गेलो.
किती काळ झाला असेल माहीत नाही, पण मधेच मला हृतिकचा आवाज आला.
हा पण शहरी झालेला शेवटी, ह्याला पण इतक्या लवकर झोप येणार नव्हती.
उठून लाईट लावली, रात्रीचे ११ वाजून गेलेले, पून्हा एकदा हृतिकचा आवाज. 
आवाजाचा मागोवा घेतला, खिडकीच्या बाहेरून येत होता.
हा इतक्या रात्री बाहेर काय करतो. 
खिडकी उघडली, सगळीकडे अंधार होता, रातकिडे आवाज करत होते, तितक्यात बाहेरच्या चंद्र प्रकाशात एक अंधुकशी आकृती दिसली.
बहुतेक हृतिक लघुशंकेसाठी गेला असावा.
मी मागून हाक मारली, तसं त्यानेही मला बाहेर बोलावलं.
पण त्याने मला जी हाक मारली, ती नेहमी सारखी नक्कीच नव्हती.
मला काहीतरी गडबड वाटत होती, पण दुसऱ्या बाजूला मला बाहेरही जायचे होते.
माझं डोकं विचार करेनासं झालं.
डोकं पकडून माझे पाय वळले थेट दरवाज्याकडे.


पण माझं भाग्य बलवत्तर की अजून काही, पण दरवाज्याची कडी काढायच्या आधीच माझ्या खांद्यावर हात पडला.
मागे वळून पाहिलं, तर स्वतः हृतिक होता.
“अरे तू, तू इथे, म…मग तिकडे बाहेर कोण?”
‘श…श, शांत राह’
त्याने मला शांत राहायची खूण केली.
माझं डोकं अजून भणभणत होतं.
हृतिकने लाईट लावून सगळ्यांना उठवलं.
मी घडलेला सर्व प्रकार त्यांना कळवळा. सगळे जण माझ्याकडे आश्चर्याने बघत होते.
त्या रात्री पुरते आम्ही सगळे हॉल मधेच झोपलो.
झालेल्या प्रकारामुळे झोप कधीच मरून गेलेली.
मी तसाच बसून राहिलो, रात्री केव्हातरी झोप आली.
सकाळी उठलो तेव्हा कुठे डोकं ठीक झालेलं.
सकाळी पुन्हा एकदा तो भयाण प्रसंग आठवायचा प्रयत्न केला.

केवळ हृतिक मुळे मी त्यादिवशी वाचलो.
त्याने माझी मस्करी करण्याची एक ही संधी सोडली नाही.
हाकामारी सगळ्यांना हाका मारते, तू तिच्यापेक्षाही ग्रेट, हाकामारीला तूच हाक मारलीस, वाह…
पण मला माहित ही मस्करीची गोष्ट माझ्या साठी तरी नव्हती.
आजही तो प्रसंग आठवला, की जीवाचा थरकाप उडतो.
माझी गोष्ट संपली, तसे बाकीच्यांचे चेहरेही गंभीर पण हस्यप्रद झालेले.
तितक्यात मीरा म्हणाली (कदाचित ती गोष्ट संपायचीच वाट बघत होती).
” अरे ऋषी तू तर हाकामारी ला हाक मारलीस, माझ्या बाबांनी तर भुताशीच कुस्ती खेळेलली”

तुम्हाला ही Marathi Bhaykatha no. 19 – हाकामारी

कशी वाटली हे comments करून आम्हाला सांगा. आशा आहे की तुम्हाला Horror Stories In Marathi- हाकामारी  ही भयकथा आवडली असेल.

जर तुम्हाला हि भयकथा – हाकामारी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या friends सोबत social networks जसे की Facebook, google, twitter इत्यादी वर share करा.

तसेच Like करा आणि ह्या आणि अश्या बऱ्याच कथा Audible स्वरूपात ऐकायच्या असतील तर आपल्या Storyteller Rushi च्या YouTube Channel ला भेट द्या.तुम्हाला सुद्धा तुमच्या Horror Stories किंवा तुमचे horror experience आमच्या पर्यंत पोहचवायचे असतील तर Email : Storytellerrushi@gmail.com यावर mail करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply