Horror Stories In Marathi – आजची हि Marathi Gudhkatha/ Bhaykatha no. 15 – तो..आज आपण वाचूया अंगाचा थरकाप उडवणारी अजून एक गूढकथा.

Marathi Gudhkatha/Bhaykatha no. 15 – तो.. (Horror Stories In Marathi)

“For every action, There is an equal and opposite reaction” – This is called Newton’s third law of motion.

अरे यार., वीट आलाय ह्या नुसत्या अभ्यासाचा, कधी सुखाने जगून नाही देत..
“जाऊदे कूल डाऊन ऋषी”, काहीही झालं तरी रागावर नियंत्रण ठेवायचंय.

एकतर हा होम वर्क, आणि त्यात भर दुपारी लाईट गेली, त्यामुळे थोडं फार मनावरचा ताबा सुटणे साहजिकच आहे.

काय करावं बरं..

बाहेर एक फेरफटकाच मारून येतो, तेव्हढ्यातल्या तेवढयात लाईट आली तर आली, नाहीतर निदान मन तरी शांत होईल.

माझी ओळख करून देतो,, “मि _____ माझं नाव काय बरं?. आताच तोंडावर होतं.
जाऊद्या ते महत्त्वाचं नाहीये. मी मूळचा नाशिकचा पण माझी पदवी घेण्यासाठी घरापासून लांब इकडे पुण्याला आलेलो, एक भाड्याने खोली घेऊन राहत होतो, आता हेच माझं घर. पहिले तर आईचा मला इकडे पाठवायला नकार होता, ती म्हणायची माझी तब्येत नाही ठीक, पण माझ्या तब्येतीला काय होतंय, मी पूर्ण ठणठणीत आहे,
शेवटी मी सुद्धा हट्टाला पेटलो, तेव्हा कुठे त्यांचा नाईलाज झाला”.

मी बाहेर जायची तयारी केली, दुपारचे ३ वाजून गेलेले.
 शु रॅक पर्यंत पोहोचून मी माझे शूस् घालतच होतो,     
की तितक्यात माझी नजर शु रॅकच्या आतमध्ये पडली, विजेचा जसा धक्का बसावा तसाच एक धक्का ह्या वेळी मला लागलेला, सर्वांगावरून एक शिरशिरी येऊन गेली, 
शु रॅक मध्ये माझ्या बुटांच्या व्यतिरिक्त अजून एक बुटांचे जोड होते,,, गडद चॉकलेटी रंगाचे.
माझ्या जोपर्यंत लक्षात आहे, घरातून निघाल्यापासून ते ह्या रूमवर येईपर्यंत तरी माझ्या कडे एकच बुटांचे जोड होते, काळ्या रंगाचे, जे आता मी घातलेले.
मग हे ज्यादा चे जोड कोणाचे.
मी ते बूट बाहेर काढून जरा निरखून पाहिले.
ते एका दर्जेदार ब्रँडचे स्पोर्ट्स शुस्  होते, 

“नाही”,  “नाही हे माझे जोड नव्हते, एवढे ब्रँडेड शुस् घालण्याचे मी फक्त स्वप्नच बघू शकतो, But in reality, it’s not possible.

Horror Stories In Marathi – झपाटलेलं रेल्वे स्टेशन | Storyteller Rushi

विचारात जास्त वेळ न दवडता मी ते शुस् माझ्या रूमच्या बाहेर ठेवले, ज्याचे कोणाचे असतील, तो घेऊन जाईल.
शुस् बाहेर ठेवून मी माझ्या वाटेला निघालो,
बिल्डिंगमध्ये जास्त लोकं राहत नव्हती, माझी रूम दुसऱ्या मजल्यावर होती, लिफ्टचं काम चालू होतं म्हणून जिन्यानेच खाली जायचं ठरवलं,
एक एक जिना उतरून मी खाली जायला निघालो.
पूर्ण बिल्डिंगभर शांतता पसरलेली, 

दुपारची शांतता आणि रात्रीच्या शांततेत एकच फरक असतो, दुपारची शांतता भयावह वाटत नाही.
जसा बुडत्याला काठीचा आधार पुरेसा असतो, जसा वाट चुकलेल्या वाटसरूला योग्य दिशा दाखवणारा मार्ग पुरेसा असतो, जसा रात्रीच्या प्रहरी स्मशानामधून जाणाऱ्या व्यक्तीला देवाचे नामस्मरण पुरेसे असते, तसंच दुपारच्या निर्जन शांततेला उजेडाची निर्मल सोबत आणि सूर्याची अमूल्य साथ पुरेशी असते.

पण जर बुडत्याला काठीचा आधार भेटलाच नाही तर?
वाटसरूला योग्य तो मार्ग सापडलाच नाही तर?
स्मशानामधून चालणारा व्यक्ती नास्तिक असला तर?

ह्यांचीही अवस्था रात्रीच्या भयावह आणि जीवघेण्या शांतते सारखीच नाही का होणार!

मी घाई घाईने जिना उतरायला लागलो. बिल्डिंग मधली दुपारची शांतता सुध्दा जीवघेणी भासत होती.
मी भर भर पायऱ्या उतरत होतो,
टप्. टप्. टप्.

Horror Stories In Marathi – अखेरचा प्रवास | Storyteller Rushi

अरे.!  

मी पुन्हा दोन तीन पायऱ्या उतरल्या.
टप्. टप्.

हे बुटांचे आवाज माझ्या एकट्याचे तर हमखास वाटत नव्हते.
मी पुन्हा २-३ पायऱ्या उतरलो, पुन्हा तेच.
ह्या जिन्यावर माझ्या व्यतिरिक्त इतर कोणी नव्हता. मग आवाज?
माझ्या मनामध्ये अचानक भीती भरून आली, लहानपणी पासूनच्या ओळखीच्या भीतीचा देखावा डोळ्यासमोर उभा राहिला.
मी क्षणाचाही विलंब न करता झटकन मागे वळालो,
पण पाठीमागे मी मगाशी उतरून आलेल्या रिकाम्या पायऱ्यांव्यतिरिक्त बाकी कोणीच नव्हते, ना कोणी माझा पाठलाग करत होता, नाही कोणत्या बुटांचा आवाज.

जास्त विचार न करता मी पुन्हा माझ्या मार्गाला लागलो,
बाहेर उन्हाची सर कमी होत चाललेली,
 रस्त्यांवरचे गाड्यांचे आवाज, भाजीमंडईचा गोंगाट, दुरून कुठून तरी येणाऱ्या फॅक्टरीजचे कर्णकर्कश आवाज, माझ्या मनातल्या विचारांच्या कोलाहलाचा भेद करू शकत नव्हते.

ते ज्यादाचे शुज् नक्की कुठून आले?
आणि त्यानंतर आता आपल्या सोबत बिल्डिंगच्या पायऱ्यांवर घडलं ते काय होतं?

आई बोलायची की मी लहानपणा पासून खूप भित्रा आहे, छोट्या छोट्या गोष्टींना घाबरतो, दचकतो, कधी कधी तर रडतोही.
पण मी सुद्धा स्वतःला शूर, निडर सिद्ध करण्यास कोणतीच कसर नव्हती ठेवली. 
पण आता जिन्यावर पुन्हा एकदा त्या भित्र्या ऋषिकेशचं प्रतिबिंब माझ्यावर का उमटावं?
की मी अजून सुद्धा पूर्णपणे सावरलो नव्हतो?

 विचार करून करून डोकं सुन्न पडत होतं, एक फेरी मारून परत घराकडे वळालो,  डोकं फुटायला आलेलं..
घरी पोहचून शु रॅक मध्ये बूट ठेवायला गेलो, की पुन्हा एकदा जोराचा झटका लागला.
मगाशी मी बाहेर जी ज्यादा चे बूट ठेवलेले, ते पुन्हा एकदा शु रॅक मध्ये होते.
आणि ह्यावेळी ते मातीने (की चिखलाने) माखलेले.

ह्या धक्क्याचे रूपांतर जेवढ्या वेगाने भीती मध्ये झाले, त्याच वेगाने पुन्हा रागामध्ये झाले,
मी ना आव बघितला ना ताव, ते शुज् घेऊन ताबडतोब बाहेर काचारापेटीत टाकून ( जवळ जवळ फेकूनच ) आलो.

डोकं खूप दुखत होतं, घरी येऊन फ्रेश वैगेरे होऊन आधी डोके दुखीची गोळी शोधायला लागलो.
आणि नशीबाने ड्रॉवर मध्ये एक Crocin ची Tablet सापडली.
पण त्याच्या बाजूलाच अजून एक Tablet होती, 
Citalopram.
ही कोणती गोळी?.. जाऊदे

पटकन Crocin घेतली आणि थोडं वेळ तसंच पडून राहिलो.
२ ते ३ मिनिटातच गोळीचा प्रभाव डोक्यामध्ये भिनभिनायला लागला. झोपेची तंद्री जास्त होत गेली.. डोळ्यांच्या पापण्यांचा वजन शिगेला पोहोचला,
आणि बघता बघताच डोळ्यांवर झापड आली.

काही काळ तसाच पडून राहिलो..  शांत..
झोप किती मस्त असते, सगळ्या जगाचं सुखं-दुःख विसरून एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. एका स्वप्नांच्या दुनियेत,
आपण अपेक्षा करतो की इकडून कधीच बाहेर न पडावा.

माझ्या साखरझोपेची मग्नता भंग पावली जेव्हा कानावर कोणाच्या तरी गुरगुरण्याचा आवाज आला.

अथक प्रयत्न करून डोळ्यांच्या पापण्यांचा वजन कमी करण्यात यशस्वी झालो.
डोळे अर्धे उघडले, पण तरीही डोक्यामध्ये त्या गोळीचा प्रभाव प्रखर होता, एक जडपणा होता.

मी हलकेच डोळे उघडून समोर बघितले, एक काळीकुट्ट सावली, कदाचित त्या सावलीची माझ्याकडे पाठ असावी.

Horror Stories In Marathi – शौर्यकथा – वाडा | Storyteller Rushi

कोण होता तो? (सावलीवरून ‘,तो’ किंवा ‘ती’ हे ओळखता येत होतं).
डोक्याच्या गोळीचा प्रभाव एवढा जास्त होता की, मला झोपेतून उठवसं वाटतच नव्हतं.
 माझ्याच घरात,  माझ्याच समोर कोणीतरी उभं असताना सुद्धा आतमधली सर्वशक्ती नाहीशी झालेली, झोपेचा प्रभाव अधिक होता.

डोळ्यांवर पुन्हा एकदा झोपेचा पडदा येण्या अगोदर ती सावली माझ्यापासून दूर जाताना दिसली.
मी गाढ झोपेत गेलो.

जाग आली तेव्हा रात्रीचे १० वाजत आलेले, डोकं अजूनही ठणकत होतं, तोंड वैगेरे धुवून किचन मध्ये काही खायला आहे  का बघायला गेलो, पण झोपेच्या नादामध्ये रात्रीचं जेवण बनवायचं राहूनच गेलेलं.
भूकेने जीव कासावीस होत होता. परिणामी आजचं जेवण बाहेरूनच ऑर्डर करायचं ठरवलं.

ऑर्डर यायला अवकाश होता, तोपर्यंत टी.व्ही. चाळत राहिलो, पण टी. व्ही. मध्ये सुद्धा काही केल्या मन रमेना.
मनाची सारखी चलबिचल चाललेली.

खूप विचार केला, डोक्यावर पूर्ण ताण पडेपर्यंत विचार केला, मेंदूतल्या वेदना अधिकाधिक होत गेल्या, शेवटी डोक्याची शीर ताणली गेली आणि आठवलं.

ती..ती सावली.. ती इथपर्यंत माझा पाठलाग करत आली?
ह्या सावलीच्या जाच्यालाच कंटाळून तर इकडे यायचा निर्णय घेतला, आणि ही इकडे सुद्धा माझ्या मागावर आली.

आईला कितीवेळा ह्या बद्दल सांगितलं, पण तिला कधीच माझ्यावर विश्वास नाही बसला. सारखं घाबरून राहिलो, लपून राहिलो, कधीना कधी ही सावली माझ्या आयुष्यातुन जाईल ह्या आशेवर राहिलो, पण नाही.

पण आता ठरवलं, बास झालं! आधी घाबरायचो मी, पण आता.. आता नाही घाबरणार, आता तर त्या सावलीला माझ्या पासून कोणीच नाही वाचवू शकत, आई सुद्धा नाही.
मी दात-ओठ खात मोठ्यानं त्या सावलीला आव्हान केलं,

” आहे हिम्मत?, तर ते आताच्या आता माझ्या समोर, मी नाही घाबरत तुला, इथून पुढे कधीच नाही घाबरणार”

माणूस कितीही धाडसी असला, शूर असला, तरी त्याच्याही हृदयामध्ये चिंतेचा, काळजीचा किंवा भीतीचा एक छोटासा कप्पा नक्कीच असतो.
माझ्या ह्या धैर्ययुक्त आव्हानाला सुद्धा भीतीची एक वलय होती, मी कितीही निडरपणे बोललो असेन, तरीही त्याला भीतीचा एक स्पर्श जाणवत होता.
आणि ह्याची प्रचिती माझ्या दचकण्याने झाली, जेव्हा दारावरची बेल वाजली.

माझं पार्सल आलेलं , नकारात्मक विचार बाजूला ठेवून आधी जेवणावर ताव मारला.
पण जेवता जेवता सुद्धा असं वाटत होतं की कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवून आहे, 
रात्री सामसूम माळरानावरून जाताना कोणीतरी आपला पाठलाग करत आहे असं मनाला सारखं भास होत असतं,
मनाला आपला 6th सेन्स बोलतात, ते नुसतंच नाही,
येणाऱ्या कोणत्याही प्रसंगाची जाणीव हे सर्वप्रथम मनाला होत असते, तसंच काहीसं आता माझ्या बाबतीत होत होतं.
मला आता ह्या घरात माझ्या व्यतिरिक्त अजून कोणतरी असल्याची जाणीव होत होती.
मी एकटा नव्हतो, मनामध्ये भीतीचा अंश असला, तरी त्याला रागाची भक्कम जोड होती,
मी ठरवलं, आता जर परत ती सावली आली तर माझ्या हातून वाचणार नाही. आजची रात्र त्याची शेवटची रात्र ठरेल.

जेवण उरकल्यावर मी पुन्हा एकदा तो येण्याची वाट बघत राहिलो. माझ्या हातात मोठा सुरा होता (त्याला मारण्यासाठी की स्वतःच्या बचावासाठी हे ठाऊक नव्हतं).
वाघ जसा येणाऱ्या शिकारासाठी त्याच्या गुहेमध्ये टपून बसलेला असतो, तसा मी त्याची वाट पाहत होतो.

आज माझ्या त्या लहानपणा पासूनच्या भीतीचा अंत होणार होता.
एवढ्या वर्षांपासूनची माझी निडर, शूर बनण्याची ईच्छा पूर्ण होणार होती.
ते जो कोणी होत, त्याचा नाश होणार होत.

मी तसाच वाट बघत राहिलो, १ तास झाला, २ तास झाले,
तो आलाच नाही.
रात्री केव्हातरी झोप लागली.
पण झोप जास्त वेळ टिकली नाही, 

सकाळी जाग आली, तेव्हा मी लोकांच्या घोळक्यामध्ये होतो,
माझ्या घरात एवढी लोकं?
त्यामध्ये ४-५ पांढरे कपडे घातलेले आणि बाकी बघ्यांची थोडी फार गर्दी.
माझं डोकं अजून जड जाणवत होतं. पण मी शुद्धीत होतो,
घरामध्ये लोकांची गर्दी बघून एवढा धक्का नाही बसला, जेवढा स्वतःला फॅन्सी रुपात पाहताना बसला,
अंगात चेक्स शर्ट, नॅरो जिन्स आणि पायात गडद चॉकलेटी शुज्.

मला ते अँबूलन्स मध्ये बसवून घेऊन जाऊ लागले,

जाता जाता मला त्याच पांढऱ्या शर्ट घातलेल्या लोकांनी सांगितले, की माझ्या हातात धारदार चाकु होती, आणि मोठ मोठ्याने ओरडत मी स्वतःलाच मारायला जात होतो.
वेळप्रसंग बघून शेजारच्यांनी हॉस्पिटलमध्ये फोन करून सांगितलं तेव्हा कुठे मी वाचलो.

आज २ महिने झाले मला इकडे वेड्यांच्या इस्पितळात डांबून ठेवलंय, त्यांना कोण सांगणार की मी वेडा नाहीय.

Horror Stories In Marathi – फोटो स्टुडिओ | Storyteller Rushi

तुम्हाला ही Marathi Gudhkatha/Bhaykatha no. 15 – तो..

कशी वाटली हे comments करून आम्हाला सांगा. आशा आहे की तुम्हाला Horror Stories In Marathi – तो.. ही भयकथा आवडली असेल.

जर तुम्हाला हि गूढकथा/ भयकथा – तो.. आवडली असेल तर तुम्ही तुमच्या friends सोबत social networks जसे की Facebook, google, twitter इत्यादी वर share करा.

तसेच Like करा आणि ह्या आणि अश्या बऱ्याच कथा Audible स्वरूपात ऐकायच्या असतील तर आपल्या Storyteller Rushi च्या YouTube Channel ला भेट द्या.

तुम्हाला सुद्धा तुमच्या Horror Stories किंवा तुमचे horror experience आमच्या पर्यंत पोहचवायचे असतील तर Email : Storytellerrushi@gmail.com यावर mail करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply