Horror Stories In Marathi – त्या भयाण रस्त्यावर – Marathi Bhaykatha no. 17 – आजची कथा प्रवासात्मक आहे.

काही गोष्टी मानवाच्या आकालनापलिकडे असतात, आणि असं म्हणतात ज्या गोष्टी आपल्या आकलना पलिकडच्या असतात, त्यांच्यापासून दूर राहिलेलेच बरे.

Marathi Bhaykatha no. 17 – त्या भयाण रस्त्यावर (Horror Stories In Marathi)

मानवाची उत्सुकता पाहता कधी कधी त्याची कीव येते, उत्सुकतेपोटी घेतलेले निर्णय अथवा मूर्खपणा म्हणा, थोड्या वेळाने त्याच्याच अंगलट येण्यास कारणीभूत ठरते…येथे त्याची सद्सद्विवेक बुद्धीही त्याला वाचवण्यास असमर्थ ठरते, काही गोष्टी आपल्या आकलना पलिकडे असतात हे  लक्षात यायला त्याला वेळ लागतो.राजेश आणि सतीश पुण्याहून पनवेलला त्यांच्या एका मित्राचं, अरविंदचं लग्न अटेंड करून घरी जात होते, तसं तर लग्न ६ वाजताच संपलेलं, पण हा लहानपणी पासूनचा मित्र असल्याने त्याच्या रिसेप्शनला सुद्धा थांबणे भाग होते, म्हणून जवळच्या नातेवाईकांसोबत ते सुद्धा खूप उशिरा पर्यंत थांबले,

 सर्व काम आवरता आवरता रात्रीचे १० वाजून गेलेले, पाहुणे मंडळी तर कधीच गेलेली. थोडे फार जवळचे नातलग आणि कामगार मंडळींची चलबिचल होती.

सर्व रिसेप्शन झाल्यानंतर त्यांनी नव्या जोडप्याचा निरोप घेतला आणि परतीच्या मार्गावर लागले.

संथ गतीने गाडी रस्ता कापत होती,

सतीश गाडी चालवण्यात तरबेज, त्यामुळे रस्ता कोणताही आणि कसाही असो, तो बरोबर संयमानेच गाडी चालवत असे.

प्रवास तसा ३ तासांचा होता पण एक्सप्रेसवे ने केवळ दोनच तासात पनवेल गाठू शकत होते.

गाडीत बसल्या पासूनच राजेशला डुलक्या येऊ लागल्या.

Horror Stories In Marathi – हा सागरी किनारा | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 1| Storyteller Rushi

“काय रे, जेवण जास्त झालं काय? इतक्यातच पेंगायला लागलास” सतीश मस्करीच्या स्वरात म्हणाला.

‘नाही रे, जरा थकून गेलेलो बाकी काही नाही’

“ठीक आहे, पड थोडं वेळ, मी आपल्या एरियामध्ये आल्यावर उठवेन”

राजेशला उलट चांगलंच झालं, एक मोठी जांभई देऊन तो सीट वरच झोपी गेला.

रात्रीचे ११ वाजून गेलेले, एव्हाना गाडी उपमार्ग सोडून मुख्य रस्त्याला लागलेली, तशी वाहनांची वर्दळ देखील कमी झाली, अधून मधून एखाद दुसरं कंटेनर त्याला साजेश्या संथ गतीने जात होते, कार किंवा बाईक तर तिकडून निघाल्यापासून दिसलेच नव्हते. 

राजेश झोपल्यामुळे आपला एकटेपणा दूर करण्याकरता सतीशने रेडिओचा आवाज वाढवला आणि आपल्याच धुंदीत गाडी चालवायला लागला. 

रस्ता अगदीच निर्मनुष्य होता, लाईटच्या पोलाची सोबत ह्या वेळी माणसाच्या सोबतीपेक्षा मोठी भासत होती.

सामसूम रस्त्याची सतीशला रोजची सवय होती, राजेश जागा असता तर इतक्याला टेन्शन घेऊन बसला असता.

गाडी जशी पुण्याची हद्द सोडत होती, तसं रेडिओ फ्रेक्वेन्सी सुद्धा एका चॅनेल वरून दुसऱ्या चॅनेल वर सारखी बदलत होती, कधी गाणी, कधी बातम्या, कधी गाणी.

रेडिओचा हा खेळ पाच मिनिटपर्यंत चालला आणि असं करता करता अखेरीस एका चॅनेल वर येऊन थांबला,

त्यावर बातम्या चालू होत्या, 

आधीच एवढं दमायला झालेलं आणि त्यात जरा फ्रेश वाटायला रेडिओ चालू केला तर ह्या बोरिंग बातम्या.

मनाशी विचार करून सतीश रेडिओ चॅनेल बदलणारच होता, की तितक्यात एक ओळखीची बातमी येऊ लागली, त्याचे कान टवकारले आणि जरा आवाज वाढवला.

“बातमी येत आहे थेट मुंबई-पूणे एक्सप्रेस हायवे वरून, ब्रेकींग न्युज, साताऱ्यावरून मुंबईला जाणाऱ्या ट्रकचा आणि कारचा मुंबई-पूणे एक्सप्रेसवे वर जोरदार अपघात, ह्या रस्त्यावर पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आलेली आहे, अपघातात अजून किती नुकसान झालंय, किती जणं मृत किंवा जखमी झालेत हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे, जर तुम्ही ह्या रस्त्याने जात असाल, तर ते आताच टाळा आणि जुन्या हायवेने जाणेच पसंत करा कारण पोलिसांच्या माहितीनुसार खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे”.

अरे यार. डॅम इट. 

 ह्या अपघाताच्या तर, ह्याला पण आजच व्हायचं होतं, आधीच इतका थकून गेलोय, आता जुन्या हायवेने १ तास अजून उशीर.

ह्यावेळी त्याला त्या बातमीच्या जास्त स्वतःच्या नशीबावर राग येत होता. 

एक शेवटचा चान्स म्हणून सतीशने गाडी एक्सप्रेसवेकडे वळवली, पण दुरवरूनच हायवेच्या टर्न वरच पोलिसांनी नाकाबंदी केलेली दिसली. सतीशने कचकरून ब्रेक दाबला, ब्रेक चा प्रभाव एवढा होता, की त्या धक्क्याने राजेशची सुद्धा झोप उडाली.

“काय रे, गाडी का थांबवली, ते पण एवढ्या अर्जंट, आणि हे समोर पोलीस का आहेत रस्ता अडवून, सगळं ठीक आहे ना”

राजेश ने काळजीच्या स्वरात विचारले

सतीश काय बोलणार, तितक्यात २ पोलीस त्यांच्या गाडीपाशी येताना दिसले.

‘सगळं ठीक आहे, काय झालंय, ते आता पोलीसच सांगतील त्यांच्याच तोंडून ऐक’

एवढं बोलून सतीशने रेडिओचा आवाज कमी केला आणि बाजूची काच उघडली

दोघांमधला एक पोलीस पुढे येऊन त्यांना सांगू लागला

Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 2 | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – शेवटची रात्र | Storyteller Rushi

“इथून साधारण ७ ते ८ किमीवर एक मोठा अपघात झाला आहे, त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची खूप जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे, ह्याच्या पूढे तुम्हाला नाही जाता येणार, तुम्ही जुन्या हायवेनेच जा”

दोघांनी निराशेने मान हलवली आणि गाडी जुन्या हायवेकडे वळवली.

“फ#* मॅन,

ह्या अपघाताला पण आजच व्हायचं होतं, आधीच एवढा कंटाळा आलाय, कधी एकदाचा घरी जातोय आणि ताणून झोपतोय असं झालेलं, आणि ही सुंदर बातमी मिळाली”

राहून राहून राजेशची सुद्धा निराशा झालेली.

निराशेने पुन्हा झोप यायचा प्रश्नच नव्हता, गाण्याचा आवाज वाढवून ते दोघे पुन्हा आपल्या मार्गाला लागले.

एव्हाना रात्रीचे १२ वाजून गेलेले, वाहनांची वर्दळ आता संपलेली, जुन्या हायवे वर तर ट्रक सुद्धा दिसायची मुश्किल होती. गाडी, बाईक तर लांबच.

“बघितलं? एवढंच सामसूम होतं मगाशी सुद्धा, म्हणून उठवलं नाही तुला, मला काय रोजची सवय, पण तू घाबरला असतास”

‘कोणी सोबत असताना एवढं घाबरायला नाही होत रे

पण आज रस्ता जरा जास्तच भकास वाटत आहे असं नाही वाटत?’

“खरं आहे, एक्सप्रेसवे वर थोडी फार वर्दळ तरी होती”

दोघांचं बोलणं चालूच होतं, की तितक्यात त्यांना गाडीच्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला एक फलक दिसला, 

थोडं जवळ जाऊन बघितलं तर दोघांच्या भुवया उंचावल्या,

सतीशने गाडी बाजूला लावली, आणि दोघेपण आश्चर्याने समोर बघू लागले, कारण समोर फलक तर होता, पण पूर्णपणे रिक्त, रिकामा, जसं काही त्याच्यावरची अक्षरेच कुठेतरी गळून पडलेली.

तो रिकामा फलक पाहून दोघांच्याही मनात जराशी शंका आली.

“फलक तर खूप जुना दिसतोय, असं पण नाही की नवीन आहे आणि त्यावर अक्षरे लिहायची राहुन गेलीत, एवढा सगळा गंज, धूळ आणि आजूबाजूची झाडी बघून वाटतंय किती तरी वर्ष जुना आहे” राजेश म्हणाला.

सतिशचे लक्ष मात्र दुसरीकडेच होतं, तो कोणत्यातरी विचारात मग्न होता.

त्याला असं विचार करताना बघून राजेशने त्याला विचारले, ‘काय रे, कसला विचार करतोय?’

Horror Stories In Marathi – हौंटेड हायवे | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – झपाटलेलं रेल्वे स्टेशन | Storyteller Rushi

“समोर बघ, इकडून २ रस्ते आहेत, जो पुढचा आहे थोडा कर्व लेफ्ट आहे तो आपला जुना हायवेचा रस्ता आहे, आणि त्याच्या आधी पूर्ण लेफ्ट टर्न आहे तो जरा शॉर्टकट आहे, खोपोली बायपास रोड, विचार करत होतो ह्या शॉर्टकट रोडने जायचं का”

‘अरे मग विचार कसला करतोस! तुला आहे ना माहिती रस्ता, मग घे त्या रोडने, तसं पण त्या अक्सिडेंट मुळे किती उशीर झालाय, घरचे पण काळजी करत असतील, मगास पासून २ फोन येऊन गेलेत’ 

“अरे हो, मला आहे माहिती रस्ता, मी खूप वेळा ये-जा केली आहे ह्या रस्त्याने, पण दिवसा किंवा एकदम पहाटे आणि ते सुद्धा फॅमिली आणि मित्रांसोबतच, असं रात्री अपरात्री तर कधीच नाही, मी ह्या रोड बद्दल खूप ऐकून आहे, हा रस्ता आहे शॉर्टकट पण तितकाच भयानक सुद्धा, ठीक ठिकाणी चोर- लुटारू टपलेलेच असतात, आणि ह्यात भर म्हणून हा रस्ता हौन्टेड आहे असं काहीसं मी माझ्या मित्रांकडून ऐकलेलं होतं”

‘अरे मरू दे ते, आपल्या कडे काय आहे, आपल्याला लुटून काय भेटणार त्यांना? आठाणा? 

आपण कार मध्ये सुरक्षित आहोत, आणि सध्या अश्या बनवलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा घरी लवकर पोहोचणं महत्त्वाचं नाही का?  आणि भुतांचं काय, दिसले तर मज्जाच आहे, लहानपणा पासूनची भुतांना बघायची हाऊस तरी पूर्ण होईल’ राजेश मस्करीच्या स्वरात म्हणाला.

तसे सतीशने पण पुढचा मागचा विचार न करता गाडी त्या रस्त्याला वळवली.

गाडी जशी शॉर्टकट रस्त्याला लागली तसे दोघे जरा सावरून बसले.

“इकडे तिकडे काही दिसले किंवा ऐकू आले, तरी लक्ष नको देऊस” सतीश ने राजेशला बजावले

‘चिल रे, नको टेन्शन घेऊस’

एव्हाना गाडी ने वेग पकडलेला, हा रस्ता कोणाला फारसा माहीत नसल्यामुळे किंवा ह्या रस्त्यांबद्दलच्या अफवां (आख्यायिका) मुळे, ह्या रस्त्याला एकही गाडी नव्हती, जुन्या मुख्य हायवे वर लाईटच्या पोलांमुळे जरासं हायसं तरी वाटत होतं, पण ह्या रस्त्याला लाईटचा लांब लांब पर्यन्त काहीच पत्ता नव्हता, फक्त गाडीच्या हेडलाईटचा मोजका प्रकाश.

गाडीच्या ए. सी. मुळे गाडी पूर्णपणे कूलिंग होऊन थंडी वाजायला लागली, तशी सतीशने ए. सी. बंद करून थोडा वेळ खिडकीची काच खाली केली.

जशी काच खाली झाली, तसं बाहेरच्या भयाण शांततेचा प्रत्यय त्यांना ह्या प्रवासामध्ये पहिल्यांदा आला,

आजूबाजूला जंगल असल्या कारणाने जंगली श्वापदे जशी काय खूप वर्षांनी जागी झाली होती, अधून मधून कोल्हेकुई कानांचा वेध घेत होती,

त्या शांततेची पर्वा रातकिड्यांना कुठे?,  त्यांची किरकिर चालूच होती, 

आजूबाजूचे वातावरणच एक प्रकारच्या गुढतेखाली विरून गेले होते.

दोघांना मनोमन तितकीच भीती वाटत होती पण ह्याची एकमेकांसामोर वाच्यता करू शकत नव्हते, किमान ह्या आताच्या वेळी तरी नाही.

सतीशने भीतीचं प्रतिबिंब त्याच्या चेहऱ्यावर येऊ न देता पाचवा गिअर घेऊन गाडीचा वेग अजून वाढवला, पण हा वेग जास्त वेळ टिकवता आला नाही,

कारण त्याला बाजूच्या मिरर मधून पाठी मागून एक गाडी येताना दिसली. 

आता ह्या गोष्टीने आनंदी व्हावे की घाबरून जावे, सतीशला काहीच कळत नव्हते, त्याने गाडीतल्या सगळ्या काचा बंद केल्या. आणि राजेशला ठणकावून सांगितले,

“पाठीमागून एक गाडी येते, ती आपल्याला ओव्हरटेक करून पूढे जाईपर्यंत काचा उघडू नकोस”

राजेशनेही त्याला संमती दिली.

सतीशने गाडीचा वेग जरा कमी केला, आणि मागच्या कारला जायला थोडीशी वाट दिली, थोडं वेळ जाऊ दिले, पण मागची गाडी काय ओव्हरटेक करतच नव्हती.

सतीशने थोडं कंटाळून पुन्हा एकदा मिरर मध्ये बघितले, आणि त्याने मिररमध्ये जे बघितले तिकडे बघून त्याची बोबडीच वळली, त्याच्या सर्वांगावरून एक शहारा येऊन गेला, कारण मगाशी जी गाडी त्याला दिसली होती, तिकडे आता ती गाडी नसून एक ट्रक होता, भला मोठा ट्रक.

सतीशला काय करावे, काय बोलावे काहीच कळत नव्हते,

अश्या परिस्थिती मध्ये सुद्धा त्याने आपले गाडीवरचे नियंत्रण हलू नाही दिले, आणि राजेश घाबरेल म्हणुन त्यालाही ही गोष्ट सांगितली नाही,

कदाचित मगाशी आपल्या बघण्यात काहीतरी चूक झाली असावी असा समज करून गाडी चालवू लागला.

पण त्याचा हा गैरसमज दूर व्हायला त्याला फार काळ लागला नाही, कारण त्याने पुन्हा मिरर मधून बघितले,

त्या ट्रकच्या जागी पुन्हा एकदा तीच गाडी होती, जी त्याला पहिले दिसलेली. आणि पाठून सारखी सारखी हॉर्न वाजवत होती.

‘काय रे कटकट आहे, दे त्यांना साइड, जाऊदे पूढे, कुठे चाललेत मरायला काय माहीत, हॉर्न वाजवून अक्षरशः हैराण केलाय’ राजेश संतापाने म्हणाला.

सतीश तर पुतळ्या सारखा स्तब्ध झालेला, पण तरी त्याने गाडीला जायला साईड दिली, तशी ती मागची गाडी सुद्धा पुढे जायला निघाली.

गाडी जशी त्यांच्या बाजूने चालू लागली, तसे दोघांनी एकदाच त्या गाडी कडे पाहिले, आणि आता घाबरायची वेळ एकट्या सतीश वर नव्हती, तर राजेशवर देखील होती,

कारण त्या बाजूच्या गाडीमध्ये ना ड्राइवर होता, ना कोणी अन्य व्यक्ती, पूर्णपणे निर्मनुष्य अशी गाडी आता त्यांच्या बाजूने, त्यांच्याच वेगाने जात होती.

ते दृश्य बघून दोघांचेही धाबे दणाणले, सतीशने गाडी नियंत्रणा बाहेर जाण्याआधीच अर्जंट ब्रेक मारला.

आणि दोघेही बर्फासारखे गार पडून गेले.

जसा त्यांनी ब्रेक मारला, तसा बाजूच्या गाडी ने सुद्धा १०-१२ मीटर पूढे जाऊन ब्रेक मारला.

दोघांच्याही काळजात धस्स झालं,

भीतीने परिसीमा गाठलेली, ह्यावेळी त्यांचा सगळयात जवळचा शत्रू कोण असेल तर तो त्यांचा हृदय होता

कारण हृदयाची धडधड इतकी जास्त होत गेलेली, की कोणत्याही क्षणी हृदय छातीचं बरगडं फोडून बाहेर येऊन नृत्य करायला लागेल.

“त-त-तू पण त-तेच बघितलं- ,जे मी बघितलं” राजेशने घाबरत घाबरतच विचारले.

पण सतीशचे तर त्याच्या बोलण्याकडे भानच नव्हते, तो समोर एकटक बघत होता, तितक्यात समोर थांबलेल्या गाडीमधून एक साऊंड वाजू लागला, 

सतीशला हा आवाज ओळखीचा होता,

गाडी रिव्हर्स घेताना इंडिकेटर आवाज करतो, हा तसालाच आवाज होता.

समोरची गाडी हळू हळू मागे येत होती, त्यांच्या जवळ.

“देवा अजून कोणता अंत बघणार आहेस” राजेश मनातल्या मनात देवाला धावा करत होता.

“सतीश गाडी स्टार्ट कर, पळव इकडून लवकर”

राजेश जोरात ओरडला.

हवा जशी दगडाला आपटून जाईल, तसे त्याचे बोलणे सतीश पर्यंत आपटून गेले, पूर्णपणे व्यर्थ.

कारण सतीश तर म्युसीअम मध्ये ठेवलेल्या पुतळ्याप्रमाणे स्तब्ध, गोठून गेला होता.

राजेशने त्याला जोर जोरात हलवले, तेव्हा कुठे तो भानावर आला.

आता ती गाडी अजून जवळ आलेली, काहीतरी त्वरित करायलाच हवं, एकतर गाडी इकडून सुसाट न्यावी, किंवा गाडीतून उतरून वाट मिळेल तिथे पळत सुटावे.

पण ते म्हणतात ना संकट काळात ना मन साथ देतं आणि नाही शरीर, ह्या अवकाळीच्या कठीण प्रसंगाने गाडी चालवायची सूद च जणू काही नियतीने सतिशमधून हिरावून घेतलेली.

गाडी अगदीच जवळ आली, तसं दोघांनीही ना आव बघितला ना ताव, गाडीचे दरवाजे उघडून ज्या होत्या नव्हत्या त्या शक्तीने वाट मिळेल तसे पळत सुटले.

राजेश डाव्या बाजूला बसल्याने तो रस्त्याच्या डाव्या बाजूच्या जंगलात गेला आणि सतीश उजव्या.

जंगल खूप जास्त घनदाट होतं.

दोघेही मागे न बघता, कशाचीही तमा न बाळगता पळत होते.

Horror Stories In Marathi – फोटो स्टुडिओ | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – शौर्यकथा – वाडा | Storyteller Rushi

धावून धावून श्वास घ्यायला जड झाल्यावर दोघेही थांबले, जेव्हा भानावर आले तेव्हा समजलं, आपण मुख्य रस्त्यापासून खूपच दूर जंगलात आलो आहोत, आणि त्यात दुष्काळात तेरावा महिना, की एकमेकांची सोबत सोडली.

राजेशने थोडं वेळ एका जागी उभं राहून इकडे तिकडे पाहिले, आणि परत मागे फिरला, सतिशच्या शोधात.

तो मागे फिरणार, तेच त्याला जंगलातुन थोड्या आतमध्ये काही झाडांच्या आड एक धुरकटसा प्रकाश दिसला. 

अंधारातून तिमिराकडे जाणारा मार्ग? की छलावा? की अजून काही?

राजेशचे पाय थोडे लटपटू लागले, रातकिड्यांच्या आवाजापेक्षा जास्त त्याला त्याच्या मनाचा आवाज ऐकू येत होता, इथूनच मागे फिरून जावं असं मनोमन त्याला वाटत होतं., पण एक शेवटची आशा म्हणून तो त्या उजेडाच्या दिशेने निघाला.

अंधाराची सवय झाल्यावर त्याला दिसले, की तो प्रकाश एका बल्बचा होता, आणि त्याच्याच जवळ एक छोटीशी झोपडी होती.

काय करावे? कोणी असेल का? काही मदत मिळते का बघावे?

प्रश्नांची सरबत्ती मनामध्ये चालूच होती, जास्त विचार न करता त्याचे पाय आपसूकच झोपडीकडे वळले.

झोपडीचे दार अर्धे उघडेच होते,

“कोणी आहे का आतमध्ये?” राजेश ने जोरात विचारले.

आतमधून काहीच प्रतिक्रिया नाही.

दोन पाऊले पुढे होऊन त्याने दरवाजा ढकलून आत डोकावले, आणि आतमधले दृश्य पाहून त्याची शेवटची आशा सुद्धा मावळली.

आतमध्ये माणसं… माणसं कसली, प्रेतं, प्रेतं होती ती, जमिनीवर निपचित पडलेली, पूर्णच्या पूर्ण प्रेतांची रास, सगळ्यांच्या मानेवरून रक्ताचे पाट बाहेर आलेले, त्या सगळ्यांकडे पाहूनच वाटत होते की ह्यांची कत्तल आता काही क्षणापूर्वीच झाली असेल, सगळीकडे कुबट दुर्गंध पसरलेला.

राजेशला जश्या हजार मुंग्यांनी एकदाच चावा घेतल्याची जाणीव आली, त्याची किंचाळी त्याच्या तोंडातच दबली, आणि तो जीव मुठीत धरून पाठीमागे धावत सुटला. पुन्हा एकदा वाट मिळेल तसा धावत सुटला.

दुसरीकडे सतीशला जेव्हा भान आले तेव्हा त्याला उमगलं, तो गाडीपासून खुपच लांब जंगलात आलेला, आजूबाजूला काळोख, टाचणी पडली तरी आवाज घुमेल एवढी शांतता, सतिशच्या डोक्यामध्ये काय आले, त्यालाच माहीत, तो तसाच माघारी फिरला, राजेश गाडीजवळच असेल, त्याला एकट्याला सोडून आपण इकडे पळून आलो.

तो माघारी फिरून परत जाऊ लागला, मगासच्या जंगली श्वापदांच्या आवाजाची जागा आता शांततेने घेतलेली, इतकी शांतता, की त्याला त्याच्या हृदयाचे ठोके पण ऐकू येत होते.

सतीश चालत तर होता, पण थोडं संशयास्पद, कारण तिकडून माघारी फिरल्यापासून त्याला त्याच्या चपलांच्या आवाजाखेरीज पाठीमागून अजून एका चपलांचा आवाज ऐकू येत होता.

सतीशने आपल्या चालण्याचा वेग वाढवला, तसा मागच्या पावलांचा वेग देखील वाढला.

आता मात्र सतिशची पाचावर धारण बसली, आता धावण्यावाचून पर्याय नव्हता, त्याने पाठीमागे न बघताच धूम ठोकली ती थेट गाडी पार्क केलेली तिकडे.

गाडीजवळ मुख्य रस्त्यावर आल्यानंतर कुठे त्याला जरा हायसं वाटलं, कारण समोरच्या झाडीमधून राजेश देखील पळत पळत येत होता.

“चल, पटकन आपल्याला इकडून लवकर निघायला हवं” राजेश धापा टाकत म्हणत होता.

त्याच्यासोबत सुद्धा काहीतरी विपरीत घडले हे समजायला सतीशला फार काळ लागला नाही, आता जास्त वेळ दवडण्यापेक्षा इकडून लवकरात लवकर बाहेर पडणे महत्त्वाचे होते.

त्यांनी गाडी काढली, आता मात्र ती मघासची विना-ड्रायव्हरची गाडी तिकडे कुठेच नव्हती.

त्यांना आणखीच बरं वाटलं, 

सतीश गाडी चालू करणार, की तितक्यातच त्याला आठवलं, गाडीची चावी? मगाशी गाडी टाकून पळालो तेव्हा चावी गाडीतच होती, आता कुठे गेली?

त्यांच्या विचारांचे चक्र संपायच्या आधीच त्यांच्या पाठीमागून त्यांच्या डोक्यावर जोरात प्रहार झाले, डोकं सुन्न आणि बधिर होत गेलं, सर्व अवयव लुळे पडले, रक्ताची चिरकांडी उडाल्याची एक शेवटची भावना त्यांच्या मनात आली आणि काही समजायच्या आधीच दोघांची शुद्ध हरपली ती कायमचीच.

“ए चल चल, बॉडी ठिकाने लगाओ बे इनकी टाइम कम है” जग्गा त्याच्या साथीदारांना सांगत होता.

‘इनकी ऐसी की तैसी, कितनी भारी बॉडी है बे, क्या खाके निकले थे साले’

“मुँह कम, हात ज्यादा चलाओ, दूसरा शिकार आने से पहले इनको ठिकाने लगाओ, चलो”

जग्गा आणि त्याचे तीन साथी, रोज रात्री अपरात्री(ना जाणे कितीवर्षांपासून) ह्या रस्त्यावर लूटमार, चोरी, डकैथी करत होते. आणि आज नेमकं आयतेच राजेश आणि सतीश त्यांच्या हाती गवसलेले.

दोघांच्या शरीराची विल्हेवाट लावल्यानंतर ते सगळे शेकोटी पेटवून ड्रिंक करायला बसले.

‘कितने दिनों बाद बड़ी शिकार आयी भाई’ 

“साला अगर वो…वो क्या कहते है उसको,

तेरी वो ऑटो ड्राइवर वाली गाड़ीया ना होती, तो ये शिकार भी हात से चली जाती, अभी रमन तू और ये नया छोकरा इसको लेके कल शहर जाना और इन २ शाणो की गाड़ी बेच के आना अच्छे दाम मैं”

‘भाई वो तो जाने दीजिए, लेकिन हमारी उस झोपड़ी वाली मरने की एक्टिंग कैसी लगी’

“अरे सब बढ़िया, मेरे बच्चों, मेरे तीन शेर हो तुम, अभी जश्न मनाओ”

सगळं एन्जॉय करून झाल्यावर जग्गा परत उठला, दुसरी कोणती गाडी येते का बघायला.

‘भाई आज के लिये बस हुआ ना। अब कल करते है बाकी का काम’

“अरे अभी तो ज्यादा देर भी नही हुई, क्या करेंगे बैठ के,

एक और शिकार करते है, चल गाड़ी निकालो”

त्यांनी गाडी काढली आणि पुन्हा रस्त्याच्या सुरुवातीला जाऊ लागले.

गाडीने स्पीड पकडलं, रस्ता मोकळा असल्यामुळे ते कशीही गाडी चालवत होते, सगळेच्या सगळे जास्त झालेल्या ड्रिंक्स मुळे पूर्णपणे नशेत होते, काळाचे, वेळेचे भान नव्हते, आपण काय करतो, कुठे चाललोय, कदाचित आपण कोण आहोत ह्याचेही भान नसावे.

समोरून भरधाव वेगात एक गाडी येत होती, नशेमध्ये असलेल्या त्यांना ह्याची कल्पना यायला कदाचित वेळ लागला, ती गाडी वेगाने ह्यांच्या गाडीच्या दिशेनेच येत होती, नशेमुळे हात, पाय, मन काहीच नीट साथ देत नव्हते, समोरच्या गाडीचा प्रकाश डोळ्यांवर हावी झाला तसं सगळ्यांनी डोळे मिटून तोंडावर हात आणले, आणि मोठ्या आवाजात समोरची गाडी ह्या गाडीवर येऊन धडकली, एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. सगळे गाडीच्या बाहेर एखाद्या कागदाच्या कपटा प्रमाणे फेकले गेले.

जग्गाला शुद्ध आली तेव्हा तो जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, आसपास काय चाललय हे समजायला ताच्या मेंदूने थोडा कालावधी लावला.

थोडा कुथत कुथत कसा बसा त्याच्या पायावर उभा राहिला.

शरीरावर अपघाताने जागो जागी फाटलेले, खरचटलेले, त्यातून रक्त निघून जीवघेणी वेदना सुरू होती.

त्याने आजू बाजूला पाहिले, त्याचे तीनही साथी निपचित पडून होते, ते मृत झालेले, कोणाची मान गेलेली, कोणाचे हात, कोणाचे पाय.

समोर गाड्या होत्या, एक त्यांची जिचा आता पूर्णपणे चुराडा झालेला, आणि दुसरी समोरची. त्या गाडीला मात्र थोड्या पण स्क्रॅचेस नव्हत्या, त्याने डोळे पुसून नीट निरखून पाहिले,

आणि त्याला एक जोरदार धक्का बसला,

 ही त्या दोघांची सतीश आणि राजेश ह्यांची गाडी होती. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

असं कसं शक्य आहे, 

त्या समोरच्या गाडीची लाईट पुन्हा पेटली गेली, इंजिनचा आवाज आला, गाडी स्टार्ट होऊन जग्गाच्या दिशेने येऊ लागली,

गाडी ने एकदमच वेग वाढवला, 

जग्गा तिकडून हालायच्या देखील मनस्थितीत नव्हता,

पळायचं तर दूरच.

ती गाडी जग्गाच्या अजून जवळ आली, वेगाने, अजून वेगाने, सुसाट, जणू जग्गाच्या शरीराचाच वेध घेत.

जग्गाची कायमची शुद्ध हरपायच्या आधी त्याला दिसले, ड्राइविंग सीट वर कोणीच नव्हते.

Horror Stories In Marathi – तो..| Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – खेकडा? की | Storyteller Rushi

तुम्हाला ही Marathi Gudhkatha/Bhaykatha no. 17 – त्या भयाण रस्त्यावर

कशी वाटली हे comments करून आम्हाला सांगा. आशा आहे की तुम्हाला Horror Stories In Marathi – त्या भयाण रस्त्यावर ही भयकथा आवडली असेल.जर तुम्हाला हि गूढकथा/ भयकथा – तो.. आवडली असेल तर तुम्ही तुमच्या friends सोबत social networks जसे की Facebook, google, twitter इत्यादी वर share करा.तसेच Like करा आणि ह्या आणि अश्या बऱ्याच कथा Audible स्वरूपात ऐकायच्या असतील तर आपल्या Storyteller Rushi च्या YouTube Channel ला भेट द्या.

तुम्हाला सुद्धा तुमच्या Horror Stories किंवा तुमचे horror experience आमच्या पर्यंत पोहचवायचे असतील तर Email : Storytellerrushi@gmail.com यावर mail करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply